ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ट्रकचालकांच्या आंदोलनाच्या भीतीने पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा !

मुंबई : वृत्तसंस्था

देशात पुन्हा एकदा ट्रकचालक संपावर जाण्याच्या भीतीने राज्यातील अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. राज्यातील वाहन चालकांनी पुन्हा एकदा संप पुकारला आहे, अशी बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच छत्रपती संभाजीनगरातील पेट्रोल पंपांवर नागरिकांनी मोठी गर्दी केली. मात्र, याबाबत चालक संघटनांनी अद्याप माहिती दिली नसल्याचे छत्रपती संभाजीनगर पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी सांगितले.

दुसरीकडे येत्या 9 जानेवारीपासून रात्री बारानंतर अवजड वाहन चालक संपावर जाणार असल्याची माहिती जय संघर्ष वाहन-चालक मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय हळनोर यांनी दिली. मात्र, राज्यातील इतर चालक संघटना यामध्ये सहभागी होणार आहेत का नाही याबाबात संभ्रम आहे. ट्रक, टँकरचालक रात्रीपासून पुन्हा संपावर जाणार या भीतीने सोमवारी छत्रपती संभाजीनगरमधील पेट्रोलपंपावर सकाळपासूनच शहरवासीयांनी रांगा लावल्या. सेव्हन हिल्स् परिसरातील पेट्रोल पंपावर तर गजानन महाराज रोडवरूनच रांगा लागल्या.

रोडवर आणि पेट्रोल पंप परिसरात प्रचंड गर्दी झाली. येणारे-जाणारे वाहनधारक थांबवून विचारणा करत. त्यातील अनेक जण संप होणार म्हटल्यावर रांगेत लागत. विशेष म्हणजे यावेळी ट्रॅक्टर चालक ट्रॉलीसह रांगेत उभे राहिले. त्यामुळे गर्दी जास्त तुंबली. यातल्या बहुतांश जणांनी आपल्या गाड्याच्या टाक्या फुल्ल करून घेतल्या. छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोड, गारखेडा परिसर, बीड बायपास, सिडको या भागातल्या अनेक पंपावर अशीच गर्दी होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!