पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून गुन्हेगारी व आत्महत्याच्या घटना घडत असतांना आता मंचर येथे आपापसांत भांडण झाल्यानंतर प्रेमीयुगुलाने विठ्ठलवाडी-टाकेवाडी (ता. आंबेगाव) येथील डिंभे धरणाच्या डावा कालव्यात उडी मारली. कविता पारधी (वय 36, रा. टाकेवाडी-ठाकरवाडी, ता. आंबेगाव) व पप्पू खंडागळे (वय 33, रा. जऊळके बुद्रुक-ठाकरवाडी, ता. खेड) अशी त्यांची नावे आहेत. शनिवारी (दि. 5) पहाटे पाच वाजता ही घटना घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कविता, पप्पू व कविताच्या मामाची अल्पवयीन मुलगी हे दुचाकीवरून टाकेवाडी येथील ठाकरवाडीकडे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास येत होते. टाकेवाडी डावा कालव्यानजीक आल्यानंतर कविता व पप्पू यांच्यात भांडण झाले. त्यानंतर कविताने कालव्यातील पाण्यामध्ये उडी मारली. तिला वाचविण्यासाठी पप्पूने उडी मारली. दोघांनाही पोहता येत असल्याने ते बाहेर येतील, असे अल्पवयीन मुलीला वाटले. परंतु, दोघेही दिसेनासे झाल्यानंतर मुलगी घाबरून रामदास चिखले यांच्या शेडमध्ये येऊन बसली.
रामदास चिखले शेडमध्ये आले असता त्यांना तेथे मुलगी दिसली. त्यांनी तिची विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. पोलिस पाटील उल्हास चिखले, उपसरपंच समीर काळे, ग्रामस्थ राहुल नंदराम चिखले, भानुदास चिखले, रवींद्र मोतीलाल काळे, अनिल दगडू जाधव, शांताराम शंकर चिखले, विशाल रामदास चिखले यांनी घटनास्थळापासून जवळपास सात ते आठ किलोमीटर अंतरात डावा कालव्याची पाहणी केली. परंतु, कविता व पप्पू आढळले नाहीत.
कविता आणि पप्पू यांनी कालव्यात कशामुळे उडी मारली, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. पोलिस पाटील उल्हास चिखले यांनी मंचर पोलिसांना याबाबत माहिती दिली. मंचर ठाण्याचे सहायक फौजदार एस. आर. मांडवे, संदीप कारभळ, हवालदार संजय नाडेकर, योगेश रोडे यांनी घटनास्थळी भेट दिली.