नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशाच्या प्रशासकीय वर्तुळाला हादरवणारी कारवाई सीबीआयने केली आहे. 60 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप असलेल्या झाशी रेंजच्या सीजीएसटी उपायुक्त आणि आयआरएस अधिकारी प्रभा भंडारी यांना सीबीआयने अटक केली आहे. एका रेकॉर्ड केलेल्या फोन कॉलमधील धक्कादायक संवादामुळे हा संपूर्ण भ्रष्टाचाराचा खेळ उघडकीस आला आहे.
कर चुकवेगिरीचे प्रकरण मिटवण्यासाठी एका फर्म मालकाकडून 1.5 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. यामधील पहिला हप्ता 70 लाख रुपयांचा होता. लाच स्वीकारल्यानंतर एका सुप्रिटेंडंटने फोन करून “मॅडम, पैसे मिळालेत” असे सांगितल्यावर, “ठीक आहे, ते गोल्डमध्ये बदला” असा आदेश प्रभा भंडारी यांनी दिल्याचे कॉल रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट ऐकू येते. रोख रक्कम लपवण्याऐवजी सोन्यात रूपांतर करून पुरावे नष्ट करण्याचा त्यांचा डाव होता.
मात्र सीबीआय आधीपासूनच या संपूर्ण सिंडिकेटवर नजर ठेवून होती. फोन कॉल ट्रेस केल्यानंतर झाशी, दिल्ली आणि ग्वाल्हेर येथे एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईत सुमारे 9 कोटी रुपयांची रोख रक्कम, मोठ्या प्रमाणात सोने-चांदी तसेच महत्त्वाची मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
या प्रकरणात प्रभा भंडारी यांच्यासह दोन सुप्रिटेंडंट, एक फर्म मालक आणि एका वकिलालाही अटक करण्यात आली आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी उघडकीस आलेल्या या ‘फिल्मी’ लाचखोरी प्रकरणामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली असून, सीबीआयकडून पुढील तपास सुरू आहे.