मुंबई : वृत्तसंस्था
देशातील आगामी लोकसभेसाठी सर्वच पक्षांनी आतापासून मैदानात फेरफटका मारायला सुरुवात केली असून यातच राज्यातील महाविकास आघाडी, म्हणजेच शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे, अशी माहिती समोर येत आहे. याबाबत काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी माहिती दिली आहे.
महाविकास आघाडीचे जागावाटप 10 तारखेला निश्चित होणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. याआधी शुक्रवारी मुंबईतील ट्रायडंट हॅाटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठिकाला महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबतच वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ही उपस्थित होते.
इंडिया आघाडीत सामील करुन घ्या, याबाबत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी अनेकदा जाहीरपणे भूमिका मांडली होती. त्याअनुषंगाने आता महाविकास आघाडीत देखील अधिकृतपणे आंबेडकरांची एंट्री झाली आहे. प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच आपल्या टीमसोबत बैठकीसाठी ट्रायडंट येथे हजर राहिले. शुक्रवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत शरद पवार जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि नाना पटोले उपस्थित होते. तर ठाकरे गटाकडून संजय राऊत उपस्थित होते.
या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले आहेत की, ”प्रकाश आंबेडकर हे शुक्रवारी बैठकीत सामील झाले. पुढची दिशा ठरली असून सकारात्मक चर्चा झाली. भाजपाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत होईल, असं काहीही करायचं नाही.” ते म्हणाले, देशातील वातावरण बदलण्सासाठी आम्ही एकत्र राहणार. भाजपाचा पराभव ही आमची प्राथमिकता असून त्यानंतर जागावाटप. तसेच आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे राऊत म्हणाले आहेत.