दौंड वृत्तसंस्था
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी पाटस येथे पार पडलेल्या कार्यकर्ते मेळाव्यात भाजपवर हल्लाबोल केलाय. भाजपने मला मंत्रिपद दिले नाही म्हणून मी महायुतीतून बाहेर पडलो नाही, तर भाजपने मला धोका दिला, माझा पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला. भाजप हा महागद्दार आहे. माझा पक्ष मला वाढवयचा आहे. त्यामुळेच विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असुन महायुती आणि महाविकास आघाडीला आव्हान देणार आहे. असा निर्धार त्यांनी केला.
दौंड तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पाटस येथे सोमवारी (दि २१) कार्यकर्ता निर्धार मेळावा आयोजित केला होता. उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महादेव जानकर यांनी भाजप व दौंड भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यावर वर सडकून टीका केली.
जानकर म्हणाले, भाजप हा छोट्या राजकीय पक्षांना संपवण्याचे काम करत आहे. त्यामुळे यापुढे भाजपसोबत युती नाही. सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत रासप हा भाजपसोबत महायुतीत घटक पक्ष होता. मी राहुल कुल यांना रासपाची उमेदवारी दिली होती. मात्र कुल यांनी ऐनवेळी माझ्या पक्षाचा बी फार्म बाजूला ठेवून भाजपचा फॉर्म भरला. त्यावेळी माझ्या डोळ्यात पाणी आले. कुल यानी मला धोका दिला हे आजही विसरलो नाही.
माझ्या काही कार्यकर्त्यांनीही गद्दारी केली. पैशासाठी त्यांनी कुल यांचे काम केले. पण दौंडच्या जनतेने माझ्यावर खूप प्रेम केले. मला लोकसभा निवडणुकीत 25 हजारांचे मताधिक्य दिले होते. पण माझी चूक झाली, मला माफ करा. पण मी खचणार नाही आणि घाबरणारही नाही. दौंडसाठी सक्षम असा माळी किंवा मराठा समाजाचा तरुण उमेदवार दिला जाईल. दौंडकरांनो गद्दार विद्यमान आमदारांना कोणत्याही परिस्थितीत पाडायचे आहे.
मी मंत्री असताना दौंडसाठी जास्त निधी दिला आहे. मी मंत्रीपद मागणार नाही, तर मंत्रिपद देणारा आहे. मला आमदार व्हायचे नाही, पण मी इतरांना आमदार करणार आहे. राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे 15 आमदार निवडून येतील. रासपशिवाय महायुती, महाविकास आघाडी राज्यात सत्ता स्थापन करू शकणार नाही. असा विश्वास जानकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
मी कोणताही भ्रष्टाचार केला नाही. माझ्यावर ईडी चालणार नाही, पण कोणी किती भ्रष्टाचार केलाय आणि कोणाची किती लफडे आहेत हे मला माहिती आहे. माझ्या कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचा किंवा धमकी देण्याचा प्रयत्न केला, माझ्या कार्यकर्त्यांच्या केसाला जरी धक्का लागला, तर मग मात्र जशास तसे उत्तर दिले जाईल, मी हिंदकेसरी आहे हे लक्षात ठेवा असा इशाराही जानकर यांनी यावेळी दिला. राष्ट्रीय समाज पक्ष, दौंड जन क्रांती आणि रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.