मुंबई : वृत्तसंस्था
प्रभू श्रीरामांचे परमभक्त, पवनपुत्र हनुमानांचा जन्मदिवस म्हणजेच हनुमान जयंती. देशभरात हनुमानजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदींसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या एक्स सोशल मीडिया अकाउंटवरुन हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“निष्ठेचा महामेरू बजरंगा… माझ्या व माझ्या सहकाऱ्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर आणि ‘नवनिर्माणा’च्या दूरदृष्टीतून महाराष्ट्राला ‘नवसंजीवनी’ मिळू दे… आपणा सर्वांना हनुमान जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!,” असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मारुतीरायाला साकडं घातलं आहे.
देशभरातील माझ्या परिवाराला हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. पवनपुत्र हनुमानांचे समर्पण सर्व राम भक्तांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील. त्यांच्या कृपेने विकसित भारताच्या संकल्पाला नवी ऊर्जा मिळावी हीच माझी सदिच्छा, जय बजरंगली, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हनुमानदिनाच्या शुभेच्छा दिल्यात.
दरम्यान, आज सर्वत्र हनुमान जयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यभरातील विविध हनुमान मंदिरात आज पहाटेपासून भाविकांची मारुतरायांच्या दर्शनासाठी गर्दी दिसून येत आहे. ठिकठिकाणी हनुमान चालिसाचे पठण करण्यात येत आहे. जय हनुमान, रामभक्त हनुमानकी जयच्या जयघोषाने पहाटेपासून मंदिर परिसर दुमदुमुन गेला आहे