ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्या विठूरायाची महापूजा

पंढरीनगरी दुमदुमली! कार्तिकी यात्रेसाठी भाविकांची अलोट गर्दी

सोलापूर : उद्या होणाऱ्या कार्तिकी सोहळ्यासाठी पंढरी नगरी सज्ज झाली असून, आज कार्तिक शुद्ध दशमीला शहरात सात लाखापेक्षा जास्त भाविक दाखल झाले आहेत. आज सायंकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर येथे दाखल होतील. तसेच, उद्या पहाटे त्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न होणार आहे. यावेळी मंदिर विकास आराखड्याचा नारळ देखील फडणवीस यांच्या हस्ते फोडण्याची तयारी मंदिर प्रशासनाने केली आहे. त्यामुळे, 73 कोटीच्या या आराखड्याच्या कामांना सुरुवात होण्याची शक्यता आहे.
कार्तिकीला येणाऱ्या लाखो भाविकांच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराला पुण्यातील विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांच्याकडून 5 टन फुलांच्या सजावटीचे काम सुरु झाले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या विठूरायाची महापूजा होणार आहे. तसेच, पंढरपूरमध्ये दाखल झाल्यावर आज उपमुख्यमंत्री फडणवीस हे मराठा समाजाच्या शिष्ठमंडळाशी चर्चा करणार आहे. यासोबतच, धनगर समाज आणि आदिवासी कोळी समाजाच्या शिष्ठमंडळाकडून देखील फडणवीस यांची भेट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. पहाटे 73 कोटीच्या मंदिर विकास आराखडा भूमिपूजन होईल. भूमिपूजननंतर उपमुख्यमंत्री आणि मानाचा वारकरी यांचा मंदिराच्या वतीने सत्कार करण्यात येईल. सध्या दर्शन रांग गोपाळपूर येथील 10 पत्राशेडमध्ये असून, भाविकांना दर्शनाला बारा तासांचा अवधी लागत आहे. भाविकांच्या उत्साहाला एकच उधाण आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!