ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला

मुंबई वृत्तसंस्था

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार बाजी मारल्या नंतर आता राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यातच आता नव्या सरकारचा शपथविधी कधी पार पडणार याची तारीख समोर आली आहे.

भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली. येत्या ३० तारखेला नव्या सरकारचा शपथविधी पार पडेल. भाजपसह इतर पक्षांचे नेते कार्यकर्ते यांना त्यांचा मुख्यमंत्री व्हावा, असे वाटत आहे. आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री का होऊ नये अशी प्रत्येक पक्षाची ही भावना असते. त्यामुळे सर्वजण मागणी करत आहेत. एकनाथ शिंदे हे महायुतीत नाराज नाहीत. या फक्त चर्चा आहेत. तसेच मुख्यमंत्रि‍पदाचा आणि मंत्रि‍पदाचे फॉर्म्युला एकत्रित बसून ठरवला जाईल, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले.

दरम्यान महायुतीकडून लवकरच सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईसह दिल्लीत बैठकांवर बैठका पार पडताना दिसत आहेत. त्यातच आता नवीन सरकार कधी शपथ घेणार, मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी माहिती समोर आले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांसोबत 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, असेही बोललं जात आहे. यात भाजपचे १० आमदार, शिवसेना शिंदे गट 6, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे राजभवनात दाखल झाले. यानंतर अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र त्यांच्याकडे सोपवलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!