मुंबई : वृत्तसंस्था
मुंबई – एमआयएम पक्षाच्या मुंब्रा येथील नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्या वादग्रस्त विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या “फक्त मुंब्राच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा होईल” या वक्तव्यामुळे वादाला अधिकच चिघळ मिळाली आहे.
सहर शेख यांच्या विधानानंतर त्यांच्यावर विविध स्तरातून तीव्र टीका झाली असून त्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट करत भाजपवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी भाजपच्या काही नेत्यांवर थेट निशाणा साधला.
जलील यांच्या वक्तव्यावर भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “तुमच्या सात पिढ्या आल्या तरी महाराष्ट्र हिरवा होणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी जलील यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच, जलील यांच्या विधानाचा त्यांनी तीव्र निषेध नोंदवला.
“आम्ही तुम्हाला या देशात अल्पसंख्याक म्हणून राहू दिले याचा अर्थ असा नाही की आम्ही गप्प बसू. गरज पडल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी आम्हाला १५ सेकंदही पुरेसे आहेत,” असा इशाराही नवनीत राणा यांनी दिला.
दरम्यान, नवनीत राणा यांनी राजकारण सोडून पुन्हा चित्रपटसृष्टीत जावे, असे विधान इम्तियाज जलील यांनी केले होते. भाजपची हिंदू–मुस्लिम विभाजनाची राजकीय रणनीती असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. या सर्व आरोपांना प्रत्युत्तर देताना नवनीत राणा म्हणाल्या, “हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आमच्या शरीरात आजही छत्रपतींच्या पुत्रांचे आणि भक्तांचे रक्त वाहते. हा महाराष्ट्र कधीही हिरवा होणार नाही,” असे ठणकावून सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
तसेच, पत्रकार परिषदेत नवनीत राणा यांनी इम्तियाज जलील यांनी महिलांबद्दल वापरलेल्या भाषेवर तीव्र आक्षेप घेतला. महिलांविषयी अपमानास्पद शब्द वापरणे थांबवले नाही, तर महाराष्ट्रात फिरणे कठीण होईल, असा थेट इशाराही त्यांनी दिला. या वादामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.