ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाराष्ट्र विकास विरोधी लोकांशी वॉर सुरू ; उपमुख्यमंत्री शिंदे !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारमध्ये अनेक मंत्री आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरु असतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समांतर सरकार चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी नवीन वॉर रूम सुरू केली, असे बोलले जात आहे. संजय राऊत यांनी तर मंत्रालयात अंडरवर्ल्ड सुरू आहे. राजकीय अराजकता निर्माण झाली, असा आरोप केला. या सर्व विषयांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीमध्ये कोणतेही कोल्ड वॉर सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्ट करत महाराष्ट्र विकास विरोधी लोकांशी वॉर सुरू असल्याची टीका विरोधकांवर केली आहे. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वॉर रूमबाबत विचारले असता, राज्यातील महत्वाच्या पायाभूत सेवा प्रकल्पांचा आढावा घेणारी एकच वॉर रुम आहे. नवीन वॉर रुम उघडली नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांकडील खात्यांचा आढावा घेण्यासाठी समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. हा कक्ष वॉर रुमशी संलग्न आहे. त्यामुळे महायुतीत कोल्ड वॉर नाही तर महाराष्ट्र विकास विरोधी लोकांशी वॉर आहे, असे त्यांनी सांगितले.

सत्तेच्या खुर्चीसाठी 2019 मध्येच त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना डॅमेज केले. हिंदुत्वाला डॅमेज केले. शिवसेनेला डॅमेज केले. आता आभाळ फाटले आहे, त्याला कुठे कुठे ठिगळ लावणार? महाविकास आघाडीसारखा आमचा खुर्चीचा अजेंडा नाही, तर महायुतीचा अजेंडा हा सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये बदल घडवणे आणि त्यांना न्याय देणे, राज्याला पुढे नेणे आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

यावेळी एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायत्ता कक्षाबाबतही प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले, शासन निर्णय 31 ऑक्टोबर 2023 नुसार उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायत्ता कक्षात वैद्यकीय मदतीचे जे अर्ज येतील, त्यांना मदत केली जाईल. या राज्याचा विकास करणे हाच महायुतीचा अजेंडा आहे. महायुती सरकारमध्ये कोणतीही समांतर यंत्रणा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी काहीजण मुख्यमंत्री असताना एकदाच मंत्रालयात आले होते, असे म्हणत एकनाथ शिंदे नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!