मुंबई वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून महाविकास आघाडीने उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी काही जागांवर मात्र घोळ कायम आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये प्रत्येकी ८५ जागांवर निवडणूक लढविण्याचे सूत्र निश्चित करण्यात आले असून २५५ जागांवर सहमती झाली आहे. उर्वरित ३३ जागांवर चर्चा सुरू असून त्यापैकी मित्रपक्षांना १८ जागा देण्याची घोषणाही पत्रकार परिषदेत करण्यात आली.
या सर्व जागा महाविकास आघाडी संपूर्ण ताकदीने लढून सत्तेवर येईल असा विश्वास शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. मात्र प्रत्येकी ८५ प्रमाणे २५५ जागा होत असल्याचे गणित ‘मविआ’ने मांडले असून अन्य जागांचा घोळ कायम असल्याचे दिसून आले.
पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी केवळ पाच दहा मिनिटे आधी ठाकरे गटाने घाईघाईत ६५ उमेदवारांची जाहीर केलेली यादी मागे घेण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावली. आघाडीतील दोन प्रमुख पक्ष असलेले काँग्रेस आणि शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात सर्वाधिक जागा मिळवण्यासाठीचा सुरू असलेला खटाटोप थांबण्याची चिन्ह दिसत नसल्याने तिन्ही पक्षांनी समान जागांवर निवडणूक लढविण्याचा रामबाण उपाय योजल्याचे बोलले जाते. ही मात्रा सर्वच घटक पक्षांना मान्य झाली असली तरी उर्वरित ३३ जागांचे वाटप हे आघाडीसमोरील मोठे आव्हान असेल.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत ‘मविआ’ची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत, खा. अनिल देसाई उपस्थित होते. या बैठकीनंतर मविआची आज संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.
संजय राऊत म्हणाले, ‘महाविकास आघाडीचे जागावाटप अत्यंत सुरळीत पार पडले आहे. तिन्ही पक्ष प्रत्येकी ८५ अशा २५५ जागा लढवतील. उर्वरित जागांवर मित्रपक्षांना सामावून घेतले जाणार आहे. मित्रपक्षांसोबत मविआचे नेते उद्यापासून (ता.२४) चर्चा सुरू करणार आहेत. त्यांच्यासोबतही आवश्यक वाटल्यास काही जागांची अदलाबदल होण्यास वाव आहे,’ असे राऊत यांनी स्पष्ट केले. समाजवादी पक्ष, माकप, भाकप, शेकापलाहा बोलाविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.