मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर आता विधानसभेसाठी महाविकास आघाडी कामाला लागली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तांतर नक्कीच होणार, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये चव्हाणांनी थेट जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचे सांगितले. आघाडीमध्ये छोटा भाऊ मोठा भाऊ असे कोणी असणार नाही. तर ज्या जागेवर ज्याचा उमेदवार निवडून येण्यासाठी सक्षम असेल, त्याला ती जागा दिली जाईल, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे आघाडीतही काँग्रेसचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे आता जागावाटपात महाविकास आघाडीमध्ये कुरबुरी सुरू झाल्याची चर्चा होत होती. मात्र, या चर्चेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पूर्णविराम दिला आहे. सर्व घटकांना एकत्रीत सामावून घेत आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युलाही स्पष्ट केला. या माध्यमातून त्यांनी महाआघाडीतील नेत्यांचेही एका प्रकार कान खेचले आहेत. मोठा भाऊ, छोटा भाऊ असे कोणी राहणार नाही. ज्या पक्षाचे जे उमेदवार चांगले असतील आणि जे निवडून येण्याची शक्यता असेल, त्यांची ती जागा असेल, असे देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास प्रत्येक मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी प्रचार केला असल्याचा उल्लेख चव्हाण यांनी केला.