मुंबई वृत्तसंस्था : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी राज्यभरात रंगात आली असून आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीकडे यावेळी सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण यंदा शिवसेना शिंदे गट आणि भाजप एकत्र निवडणूक रिंगणात उतरले आहेत, तर दुसरीकडे ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र आल्याने महायुतीपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी केल्याने मुंबईतील राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची झाली आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने महायुतीतही ताणतणाव निर्माण झाला आहे. भाजपकडून नवाब मलिक यांच्या नावाला उघड विरोध करण्यात आला होता. “मलिक असतील तर युती होणार नाही,” अशी भूमिका भाजपने घेतल्यानंतर अखेर अजित पवार गटाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
या पार्श्वभूमीवर मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार टीका केली. काही जण माझ्या नावावरून बोंबाबोंब करत होते, मी असलो तर युती होणार नाही असे सांगत होते. मात्र अजित पवार माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय योग्य असून जनता योग्य तो निकाल देईल, असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला.
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू असून, मुंबई महापालिकेचा हा सामना आता अत्यंत चुरशीचा ठरण्याची चिन्हे आहेत. कोण बाजी मारणार, याची उत्सुकता मुंबईकरांमध्ये शिगेला पोहोचली आहे.