ध्यास विश्वसार्ह बातमीचा

माढ्यात महायुतीला बसणार धक्का : नारायण पाटलांनी दिला राजीनामा

सोलापूर : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून राज्यातील राजकारण चांगलेच तापले असतांना आता एक मोठी बातमी समोर आली आहे. माढा लोकसभा मतदार संघात सत्ताधारी महायुतीला धैर्यशील मोहिते पाटलांनंतर आणखी एक झटका बसला आहे. करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते येत्या 26 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.

भाजपने माढा लोकसभा मतदार संघात विद्यमा खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाले होते. त्यांनी रविवारी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर आता करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचा राजीनामा दिला आहे. या घटनाक्रमामुळे सत्ताधारी महायुतीला माढ्यात 2 दिवसांत 2 धक्के बसले आहेत.

आपल्या 2 ओळीच्या राजीनामा पत्रात नारायण पाटील यांनी म्हटले आहे की, मी आपल्या शिवसेना पक्षाचा सक्रीय कार्यकर्ता आहे. मी आपल्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा देत आहे. तो स्वीकार करावा. नारायण पाटील यांनी 2014 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर करमाळा विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार असूनही शिवसेनेने रश्मी बागल यांना उमेदवारी दिली होती. यामुळे ते दुखावले गेले होते.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची येत्या 26 तारखेला करमाळ्यात जाहीर सभा होणार आहे. या सभेत नारायण पाटील आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे नारायण पाटील यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमात त्यांनी भाषण करून आपली पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट केली हेाती. त्यानुसार आता ते स्वतः शरद पवारांच्या तंबूत जाऊन आपली राजकीय रेषा वाढवण्याचा प्रयत्न करणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!