ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नागपुरातील कंपनीत मोठा स्फोट : चौघांचा मृत्यू तर ११ कामगार गंभीर जखमी !

नागपूर : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरी व ग्रामीण भागात आगीच्या घटना सातत्याने घडत असतांना आता नागपूर जिल्ह्यातील एमआयडीसी मधील MMP इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात चौघांचा मृत्यू झाला आहे, तर एकाचा शोध अद्याप घेतला जात आहे. या स्फोटामध्ये ११ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. उमरेड एमआयडीसीमधील एमएमपी अॅल्युमिनियम इंडस्ट्रीजमध्ये संध्याकाळी ७ वाजता स्फोट झाला, अशी माहिती उमरेड पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने दिली. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर आणि पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळी पाहणी केली. या स्फोटाबद्दल त्यांनी सांगितले की, हा कारखाना नागपूरच्या उमरेड तालुक्यात आहे. कारखान्याच्या पॉलिश केलेल्या ट्यूबिंग युनिटमध्ये स्फोट झाला आहे. MMP ही ॲल्युमिनियम फॉइल आणि पावडर तयार करणारी कंपनी आहे.

ॲल्युमिनियम फॉइल आणि पावडरचा वापर पॅकेजिंगसाठी करण्यात येतो. या कंपनीत एकूण १५० कामगार आहेत. सायंकाळच्या शिफ्टमध्ये अंदाजे १५० कामगार कामावर होते. स्फोट झाल्यानंतर आगीचा भडका उडाला. दरम्यान कामगार आपला जीव मुठीत घेऊन बाहेर धावत सुटले यामुळे अनेक कामगार थोडक्यात बचावले. पण काही जण अडकले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीचा मालक भंडारा येथील रहिवासी ललित भंडारी नावाचा व्यक्ती आहे. धुरखेडा ग्रामपंचायत क्षेत्रात असलेली ही कंपनी सुमारे दहा एकर क्षेत्रात पसरलेली आहे. स्फोटाचे कारण अद्याप कळलेले नाही. जखमींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!
Join WhatsApp Group