मुंबई वृत्तसंस्था : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत देणाऱ्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नसतानाही हजारो सरकारी कर्मचाऱ्यांनी अर्ज करून पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 12,900 हून अधिक सरकारी कर्मचारी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचे उघड झाले आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेतून स्पष्टपणे वगळण्यात आले असतानाही 12,915 कर्मचाऱ्यांच्या खात्यावर दरमहा 1,500 रुपये जमा होत असल्याचे समोर आले आहे. या नव्या आकडेवारीमुळे योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची एकूण संख्या एक लाखांच्या पुढे गेली असून, यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.
महिला व बालविकास विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित विभागांना अशा कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी मंत्री अदिती तटकरे यांनी केवळ 2,400 सरकारी कर्मचारी लाभ घेत असल्याचे सांगितले होते. मात्र, नव्या आरटीआय अहवालामुळे ही संख्या तीनपटीहून अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ऑक्टोबरमध्ये समोर आलेल्या आरटीआय अहवालानुसार 12,431 पुरुष आणि 77,980 अपात्र महिलांनीही योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे आतापर्यंत किमान 164.52 कोटी रुपयांचा गैरवापर झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सध्या राज्यातील सुमारे 2.4 कोटी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असून, यासाठी सरकारवर दरमहा सुमारे 3,700 कोटी रुपयांचा आर्थिक भार येत आहे. या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर मोठा ताण निर्माण झाल्याचे सांगितले जात असताना, अपात्र लाभार्थ्यांमुळे गैरवापर वाढल्याने सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.