---Advertisement---

कॅबिनेट बैठकीला अनुपस्थिती ? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या चर्चांना उधाण

By team
On: December 31, 2025 4:44 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई वृत्तसंस्था : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज असल्याच्या चर्चांना सध्या जोर आला आहे. वर्षाच्या अखेरच्या महत्त्वाच्या कॅबिनेट बैठकीला एकनाथ शिंदे यांनी दांडी मारल्याने या चर्चांना अधिकच हवा मिळाली आहे. बैठकीपूर्वीच शिंदे उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर येत होती. तब्येत ठीक नसल्याने ते ठाण्यातील निवासस्थानीच विश्रांती घेतील, असे सांगितले जात होते. मात्र प्रत्यक्षात ते कॅबिनेट बैठकीला अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्या नाराजीची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

दरम्यान, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांत भाजपने जोरदार मुसंडी मारल्यानंतर आता महापालिका निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. मात्र जागावाटपापासून महायुतीच्या फॉर्म्युल्यापर्यंत भाजपने पत्ते उघड न केल्याने शिंदेसेना अनेक ठिकाणी अस्वस्थ असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी अपेक्षेपेक्षा कमी जागा, तर प्रस्थापित जागांवर भाजपचा दावा यामुळे नाराजी वाढली. अखेरच्या क्षणापर्यंत चाललेल्या बैठका आणि चर्चांनंतर राज्यातील २९ पैकी केवळ ११ ठिकाणीच महायुती होऊ शकली, तर उर्वरित १८ ठिकाणी चर्चाच निष्फळ ठरल्याचे बोलले जात आहे. भाजपने आपल्याला अनेक ठिकाणी झुलवत ठेवले, असा आरोप शिंदेसेनेच्या नेत्यांकडून होत आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे. मात्र मंत्री उदय सामंत यांनी यावर खुलासा करत सांगितले की, “एकनाथ शिंदे साहेब तब्येत आणि वैयक्तिक कारणास्तव कॅबिनेट बैठकीला उपस्थित नव्हते.” तसेच, “रवींद्र धंगेकर हे पक्षाची अधिकृत भूमिका मांडणारी व्यक्ती नाहीत. त्यांनी निलमताई गोऱ्हे यांच्याशी चर्चा केली आहे. पुण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार माझ्याकडेही नाहीत. शिवसेनेची अधिकृत भूमिका एकनाथ शिंदेच स्पष्ट करतील,” असे सामंत यांनी स्पष्ट केले.

मुंबईत १३७ आणि ९० जागांवर आम्ही निवडणूक लढवत असून, आरपीआयलाही जागा दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. तरीही कॅबिनेट बैठकीतील अनुपस्थिती आणि महायुतीतील जागावाटपावरून निर्माण झालेला तणाव यामुळे शिंदेंच्या नाराजीच्या चर्चांना सध्या पूर्णविराम मिळताना दिसत नाही.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!