ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापुरात मोठी कारवाई : सहा पिस्टल, ३५ जिवंत काडतुसांसह चौघे ताब्यात

सोलापूर : वृत्तसंस्था

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणच्या पथकाने चार आरोपींसह सहा बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्टल, ३५ जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.

पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके व त्यांच्या पथकाने टेंभुर्णी येथील एका हॉटेलच्या परिसरात दोन इसम देशी बनावटीचे गावठी पिस्टलसह येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर सापळा लावून पथकाने त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे २ अवैध देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे मिळून आली. त्या दोघांवर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला, त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी आम्ही दोघे व आमचा अजून एक मित्र असे तिघे मागील काही दिवसांपूर्वी ऊस टोळी कामगार आणण्याकरिता धुळे जिल्ह्यात गेलो होतो. तेथे आम्हास मध्य प्रदेश सीमेवरील उमरटी गावात देशी बनावटीचे पिस्टल व काडतुसे विकत मिळत असल्याबाबतची माहिती मिळाली. तेथून आम्ही ६ देशी बनावटीचे गावठी पिस्टल व ३५ जिवंत राउंड लोकांना विक्री करण्याकरिता गावी घेऊन आलो.

त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने तिसऱ्या साथीदाराच्या ताब्यातून ३ पिस्टल व १९ जिवंत काडतुसे हस्तगत केली. तसेच त्या तिघांनी विक्री केलेल्या एका इसमास ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल व ७ जिवंत काडतुसे हस्तगत केले.
या प्रकरणातील प्रमुख आरोपी अजित नवनाथ पाडोळे (वय ३०, रा. शेवरे, ता. माढा) याच्यासह बिपिन तानाजी जाधव (वय ३५, रा. रामोशी गल्ली, टेंभुर्णी), आकाश मधुकर चव्हाण (रा. आडेगाव, ता. माढा), कर्णवीर ऊर्फ अतुल गपाटे (रा. भीमानगर, ता. माढा) या चारही आरोपींना अटक केली आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके, फौजदार नारायण गोलेकर, फौजदार ख्वाजा मुजावर, पोलीस हेडकॉन्स्टेबल गाडे, मोहन मनसावाले, गायकवाड, अक्षय दळवी, अक्षर डोंगरे, पोलीस नाईक शेख यांनी पार पाडली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!