जालना, वृत्तसंस्था
रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला, त्यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला सरकारनं स्वतंत्र आरक्षण दिलं, मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे, ते अजूनही आपल्या मागणीवर ठाम आहेत. तर दुसरीकडे ओबीसी समाजाकडून या मागणीला विरोध होत आहे.
दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्याच दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे. मंत्र्यांचा शपथविधी झाला, आता उद्या पत्रकार परिषद घेऊन आमरण उपोषणाची तारीख सांगणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, ज्यांना स्वतःच्या मनाने सामूहिक आमरण उपोषणाला बसायचं, त्यांनाच उपोषणाला बसवलं जाईल, उपोषणाला बसण्यासाठी कोणावरही बंधन घातलं जाणार नाही. आमरण उपोषणाला कोणी नाही जरी बसलं, तरी मी एकटाच बसणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, मी जर उपोषणाला बसा म्हटलं तर घराघरांमधून मराठे उपोषणाला बसतील, अशा इशाराही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
सरकारने या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. सरकार या आधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न नक्की सोडवेल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलल्या प्रमाणे मराठा आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.