ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मनोज जरांगे पाटलांनी मुंबई दौऱ्याचा मार्ग केला जाहीर !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा चेहरा ठरलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मुंबई दौऱ्याचा मार्ग व रुपरेषा जाहीर केली आहे. त्यानुसार, ते 20 तारखेला आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरलेल्या जालन्याच्या आंतरवाली सराटी येथून निघणार असून, 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनापासून मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण सुरू करणार आहेत.

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा सरकारविरोधात शड्डू ठोकलेत. त्यांनी सोमवारी पत्रकारांशी वार्तालाप करताना आपल्या मुंबई आंदोलनाचा संपूर्ण मार्ग व रुपरेषा जाहीर केली. ते म्हणाले की, मुंबईतील प्रस्तावित आंदोलनासाठी आम्ही 20 जानेवारी रोजी 9 वा. आंतरवाली सराटी येथून निघणार. मराठा समाजातील सर्वजण 100 टक्के मुंबईला येणार आहेत. सर्वांनी आपापल्या खाण्यापिण्याच्या वस्तू सोबत घ्याव्यात. मुंबईतील शिवाजी पार्क व आझाद मैदान ही दोन्ही मैदाने लागणार आहेत.

आंतरवाली सराटीतून निघाल्यानंतर 20 जानेवारी रोजी मराठा समाजाचा पहिला मुक्काम बीड तालुक्यातील शिरूर मातोरी डोंगर पट्ट्यात होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (21 जानेवारी) करंजी घाट, बारा बाभळी (नगर) येथे दुसरा मुक्काम होईल. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे 22 जानेवारी रोजी मराठ्यांचा तिसरा मुक्काम होईल. 23 जानेवारी रोजी पुण्याच्याच खराडी बायपास लगत चौथा व 24 जानेवारी रोजी लोणावळ्यात चौथा मुक्काम होईल. त्यानंतर 25 जानेवारी रोजी नवी मुंबईच्या वाशीत 6 वा मुक्काम होईल. अखेर 26 जानेवारी आमची दिंडी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन स्थळी पोहोचेल, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!