पुणे : वृत्तसंस्था
मराठा आरक्षणाचा मोर्चा हळूहळू मुंबईच्या दिशेने घोडदौड करत असून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मोर्चा मंगळवारी रात्री उशिरा पुण्यात पोहोचला. त्यानंतर बुधवारी पहाटे 5 च्या सुमारास मनोज जरांगेंची तिथे सभा झाली. आता हा मोर्चा लोणावळा या आपल्या पुढल्या मुक्कामाच्या दिशेने निघाला आहे. या मोर्चासाठी पुण्यात लक्षावधी मराठ्यांची गर्दी जमली होती.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी गत 20 तारखेला जालन्याच्या आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने पायी मोर्चाला सुरुवात केली आहे. मंगळवारी सायंकाळी हा मोर्चा पुण्याच्या वेशीवर पोहोचला. आज सकाळी 10 वा. वाघोली येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. हा मोर्चा मराठा आंदोलक पुण्याहून लोणावळा गाठण्याचा प्रयत्न करणार आहेत. यामुळे पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे यांचे पुण्यात दिमाखदार स्वागत करण्यात आले. कडाक्याची थंडी असतानाही पुणे व परिसरातील मराठा बांधव त्यांच्या स्वागतासाठी लाखोंच्या संख्येने जमले होते. त्यानंतर पहाटे 5 वा. जरांगेंनी विराट सभा घेत मराठा समाजाला मार्गदर्शन केले. तत्पूर्वी, मध्यरात्री 1.30 च्या सुमारास वडूज येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या परिसरातही मनोज जरांगे यांच्या स्वागताला रस्त्याच्या दुतर्फा लोक उपस्थित होते. यात लहान-थोर आबालवृद्ध आदींचा सर्वांचाच समावेश होता. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातही जरांगे व आंदोलकांचे उत्साहात स्वागत झाले. ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे बॅनर लावले होते. पदयात्रेत सहभागी बांधवांसाठी शिरदाळे व खडकी ग्रामस्थांनी चटणी भाकरीची व्यवस्था केली होती. खडकी ग्रामस्थांच्या पुढाकाराने आंदोलकांसाठी 3500 चपात्या, 50 किलो शेंगदाण्याची चटणी, 50 किलो लसणाच्या चटणीची व्यवस्था करण्यात आली.