सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज सोलापुरात शांतता रॅली होत आहे. त्यामुळे सोलापूर शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या रॅली दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा देखील होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलनाचा पुढील टप्पा आजपासून सुरू होत असून याची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातून होत आहे.
सोलापूर दौरा सुरू होण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी तुळजापूर येथे माध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी राज्य सरकार आणि राज ठाकरे यांच्यावर घनाघाती टीका केली. नारायण राणे यांनी दिलेला आव्हानाचा देखील त्यांनी समाचार घेतला. 7 ऑगस्टपासून सुरू होणारा त्यांचा हा दौरा 13 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. यामध्ये सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यादेवी नगर म्हणजेच अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यात शांतता रॅली निघणार आहे.
मराठा समाज आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आज शांतता रॅलीसाठी सोलापुरात येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात त्यांची सभा होणार आहे. तत्पूर्वी त्यांचे स्वागत छत्रपती संभाजी महाराज चौकात शेतकरी कन्यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती स्थानिक संयोजकांनी दिली. सभेसाठी पुतळा परिसरात मोठा मंच करण्यात आला आहे. मंचावर फक्त जरांगे-पाटील असतील आणि केवळ त्यांचेच भाषण होणार आहे. तसेच त्यांचे स्वागत क्रेनच्या साह्याने पुष्पहार घालून करण्याची संयोजकांची तयारी आहे.
रॅलीमुळे शाळा-महाविद्यालयांना सुटी दिली आहे. तसेच पुरेसा पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी होत असलेल्या आंदोलनांमुळे समाजजीवनात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे जरांगे-पाटील यांनी शांतता रॅली काढण्याचा निर्णय घेतला. शांतता रॅलीचा पहिला टप्पा मराठवाड्यात 6 जुलै ते 13 जुलैदरम्यान पार पडला. त्याची सुरुवात हिंगोली येथून झाली आणि समारोप छत्रपती संभाजीनगरात झाला होता.