ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मनोज जरांगेंच्या डोळ्यात तरळले अश्रू !

तब्बल २५ तास चालल्या मुलाखती

 

जालना वृत्तसंस्था

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. त्यातच आता राज्यभरातून अंतरवाली सराटीत आलेल्या हजारो इच्छुकांच्या मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांच्यासोबत तब्बल २५ तास मुलाखती चालल्या. आज सकाळी जालना जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती दरम्यान मनोज जरांगे भावुक झाल्याचं पाहायला मिळाले.

‘लढा थांबता कामा नये’, असे म्हणत, जरांगे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. यामुळे मुलाखतस्थळी काहीकाळ धीरगंभीर वातावरण झाले होते. लढायचे अन् पाडायचे अशी भूमिका घेत मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राज्यभरातून हजारो इच्छुक उमेदवारांनी गुरुवारी सकाळपासून अंतरवाली सराटी येथे मुलाखतीसाठी गर्दी केली. गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या जिल्हानिहाय इच्छुकांच्या मुलाखती आज सकाळी ९ वाजता संपल्या.

दरम्यान, आज सकाळी जालना जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती सुरू असताना जरांगे भावुक झाले. ”मराठा समाज सध्या भयाण संकटातून जात आहे, लढा थांबता कामा नये”, असे बोलत असताना जरांगे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. गोरगरिबांच्या हातात बळ नाही, त्यांना उभारी देयची आहे. एवढ्यामोठ्या बलाढ्य समाजाचे दु:ख कोणीच जाणून घेत नाही. आपला समाज देवापेक्षा मोठा असून इतिहास घडवणारा आहे. मात्र, सध्या प्रत्येक क्षेत्रात मराठ्यांना संपवले जात आहेत, असे अधोरेखित करत जरांगे यांनी मला सत्ता नको, तुमचे बळ आणि आशीर्वाद द्या. मी सर्व संकट तोडतो अशी ग्वाही दिली.

जरांगे यांनी विजयाचे गणित पाहूनच प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच आरक्षित जागेत समविचारी उमेदवारास पाठिंबा देण्यात येणार आणि इतर ठिकाणच्या विरोध करणाऱ्या उमेदवारांना पराभूत करायचे, असे सूत्र जरांगे यांनी समाजाला दिले. मुलाखतीनंतर जरांगे यांनी सर्व इच्छुकांनी त्यांच्या मतदारसंघात जाऊन चर्चा करत त्याच्यातीलच एक उमेदवार ठरवावा. जर ठरत नसेल तर ३० तारखेला मी उमेदवार देणार असल्याची माहिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!