पुणे, वृत्तसंस्था
संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी राज्यातील विविध भागांमध्ये मोर्चे काढण्यात येत आहेत. बीड, परभणीनंतर आता पुण्यातही जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला असून मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे या मोर्चात दिवंगत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार सुरेश धस, मराठा आंदोलक मनोज जरांगे, शिवसंग्रामच्या ज्योती मेटे आदींसह अनेकजण सहभागी झाले होते. मात्र, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मोर्चातून माघारी फिरावे लागले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे सीआयडी आणि एसआयटीने हाती घेतली. त्यानंतर तपासाला वेग आला आणि आरोपी जेरबंद होण्यास सुरुवात झाली आहे. तर, दुसरीकडे राजकीय नेत्यांमध्ये उठबस असणारा वाल्मिक कराड हा या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत आहे. वाल्मिक कराड हा राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप होत आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा आणि देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप पुण्यातील मोर्चात करण्यात आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी देखील मोर्चात करण्यात आली आहे.
मनोज जरांगे यांना पुण्यातील जनआक्रोश मोर्चामधून माघारी जावे लागले. पुण्यातील जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मनोज जरांगे आले होते. त्यावेळी मनोज जरांगे यांनी मोर्चात आलेल्या आंदोलकांची भेटगाठ घेतली. आंदोलकांना भेटून जरांगे परतले. मनोज जरांगे पाटील यांच्या चुलत भावाचे अपघाती निधन झाले. त्यामुळे चुलत भावाच्या अंत्यविधीला जाण्यासाठी जरांगे पुण्यातून निघाले असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे जरांगे पाटील हे आजच्या जनआक्रोश मोर्चात अनुपस्थित राहणार आहेत.