बीड : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही वर्षापासून दसरा मेळाव्याला मोठे महत्व आले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत नारायणगड येथे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आला आहे. नारायणगड येथे दरवर्षी पारंपरिक पद्धतीने दसरा मेळावा होत आला आहे. याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार असल्याची माहिती महंत शिवाजी महाराज यांनी दिली.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला. काही दिवसांपूर्वीच त्यांनी या प्रश्नावर उपोषण केले होते. सध्या त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरु असून यादरम्यानच दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर नारायणगड येथे विश्वस्तांची बैठक झाली.
या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा घेण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील सक्रीय आंदोलक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मेळाव्याच्या तयारीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. येत्या एकदोन दिवसात या परिसरात मैदानाची स्वच्छता केली जाणार असून या ठिकाणी भव्य अशा स्वरुपात हा मेळावा होणार आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दरवर्षी भगवान भक्तीगडावर मेळावा होत असतो. या मेळाव्यातही राज्यभरातील मुंडे प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. मेळाव्यातून पंकजा मुंडे या आगामी राजकीय वाटचालीचे संकेतही देत आल्या आहेत. आता नारायणगड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा होणार असून ते या मेळाव्यातून काय मार्गदर्शन करतात, आगामी वाटचालीविषयी काय भाष्य करतात, याकडे संबंध महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे