मुंबई/दिल्ली प्रतिनिधी : महाराष्ट्रातील शौर्य पाटीलने शाळेतील शिक्षकांच्या छळाला कंटाळून दिल्लीतील मेट्रोच्या खाली उडी मारून आपलं जीवन संपवलं. या घटनेनंतर आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील म्हणाले, जर शौर्य पाटील प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई झाली नाही, तर आम्ही दिल्लीत थेट आंदोलन करू.
शौर्य पाटीलने आत्महत्या करण्यापूर्वी शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापिकेच्या छळाबाबत तक्रार केलेली चिठ्ठी लिहिली होती. या घटनेनंतर शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापिकेवर कडक कारवाई करण्याची मागणी होती, मात्र कारवाई करण्यात उशीर झाल्याने मनोज जरांगे पाटील थेट दिल्ली गाठली आहेत. मनोज जरांगे पाटील म्हणाले, “मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोललो आहे. आरोपी अटकेत ठेवले गेले नाहीत, तर आम्ही दिल्लीत धडक आंदोलन करू.
त्यांनी शौर्य पाटील कुटुंबीयांच्या वेदनेची जाणीव व्यक्त करत सांगितले, मी राज्यातील सर्व खासदार आणि मंत्र्यांना अमित शहा साहेबांची भेट घेण्यास सांगितलं आहे. मी यात राजकारण आणणार नाही, तुम्हीही आणू नका. जाता जाता जरांगे पाटील यांनी पुन्हा चेतावणी देत म्हटले, “आमची दिल्ली तुंबली तर आम्ही थांबणार नाही,” आणि या वक्तव्याने २०१८ मधील मुंबईतील मराठा आंदोलनाची आठवण करून दिली आहे.