पुणे : वृत्तसंस्था
राज्यभरातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी करत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील राज्यभरात वादळी सभा घेत आहेत. मात्र जरांगे पाटील यांच्या या मागणीवरून विविध मतप्रवाह समोर येत असून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा जरांगे पाटलांवर खरमरीत टीका केली आहे. मनोज जरांगे अजून लहान आहेत. त्यांनी आणखी अभ्यास करावा, असा हल्लाबोल राणेंनी केला आहे. पुणे शहरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणे यांनी हे वक्तव्य केलं आहे.
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर टीका करताना नारायण राणे म्हणाले की, आरक्षण कसं मिळतं, भारतीय राज्यघटनेत आरक्षणाबाबत काय तरतुदी आहेत, हे जरांगे पाटलांनी जाणून घ्यावं. ओबीसीतून आरक्षण हवं की नको, हे त्यांनी मराठा समाजाला विचारावं. कोणताही मराठा ओबीसीतून आरक्षण घेणार नाही.” मनोज जरांगे पाटील यांच्या आणखी एका वक्तव्याबद्दल नारायण राणे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असताना राणे काहीसे भडकल्याचं पाहायला मिळालं. “कोण आहे जरांगे पाटील? मला माहीत नाही, मी त्यांना ओळखत नाही. कशाला तुम्ही त्याचं सतत नाव घेता? त्यांना विचारून या की घटनेच्या कोणत्या कलमानुसार मराठा आरक्षण दिलं जावं, असं राणेंनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाबाबत करत असलेल्या मागणीला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनीही जोरदार विरोध केला आहे. ओबीसी एल्गार मेळाव्याच्या माध्यमातून छगन भुजबळ आणि त्यांचे सहकारी जरांगे पाटलांवर निशाणा साधत मराठ्यांच्या ओबीसीकरणाला विरोध दर्शवत आहेत. भुजबळ यांच्या काही वक्तव्यांमध्ये वादही निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी भुजबळांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. ‘कोणत्याही नेत्याने दोन समाजात झुंज लावण्याचा प्रयत्न करू नये, असं ते म्हणाले.