मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभेपूर्वी सर्वच पक्षातील नेते सध्या राज्यातील दौऱ्यावर असतांना मनसेच्या अध्यक्ष राज ठाकरे हे देखील राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहे. बीडमध्ये राज ठाकरे यांचा ताफा अडवून त्यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकण्यात आल्या होत्या. या घटनेचे प्रत्युत्तर मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्यात दिले आहे. ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसैनिकांकडून आणि महिला कार्यकर्त्यांकडून बांगड्या आणि शेण फेकले आहे. तर गडकरी रंगायतन परिसरातही मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी सभेसाठी गडकरी रंगायतनमध्ये जमलेले उबाठा गटाचे कार्यकर्तेही यावेळी समोरासमोर आल्याने या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.
राज ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सुपाऱ्या फेकण्यात आल्या होत्या. त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्याला प्रत्युत्तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच ठिकाणी मनसेच्या महिला कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. उद्धव ठाकरे गडकरी रंगायतन मध्ये दाखल होताच महिला मन सैनिकांनी घुसून गोंधळ घालत बांगड्या फेकल्या. पोलिस बंदोबस्त असतानाही हा प्रकार घडला. त्यामुळे तणाव निर्माण झाला.
यावेळी उबाठा पक्षाचे कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते आमने-सामने आले. दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत मनसैनिकांना ताब्यात घेऊन सभेच्या ठिकाणावरून त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. दोन्ही बाजूने कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिव्या देण्यात आल्या. यावेळी बॅनर देखील फाडण्यात आले. हा सर्व प्रकार झाल्यानंतर या ठिकाणी आणखी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवण्यात आला. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सभेला सभागृहात सुरुवात करण्यात आली.