ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आजपासून बदलणार अनेक नियम: तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम !

नवी दिल्ली: वृत्तसंस्था

प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही महत्त्वाचे नियम बदलले जातात आणि यावेळीही १ ऑगस्टपासून अशाच काही नवीन नियमांची अंमलबजावणी होत आहे. या नियमांचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर होणार असून, वेळेवर याची माहिती असणे आवश्यक आहे. यात UPI व्यवहारांचे नियम, LPG दर, आणि बँकिंग सुधारणा कायदा आदींचा समावेश आहे.

UPI व्यवहारांमध्ये बदल

१ ऑगस्टपासून UPI प्रणालीत काही नव्या अटी लागू करण्यात आल्या आहेत:

  • शिल्लक तपासणीवर मर्यादा: दिवसाला फक्त ५० वेळा UPI द्वारे बँक बॅलन्स तपासता येईल.
  • खाते यादी पाहण्यावर मर्यादा: दिवसाला केवळ २५ वेळा खाते यादी पाहता येईल.
  • ऑटो-पे व्यवहार फक्त ठराविक वेळेतच: आता OTT, SIP व इतर ऑटो-पे व्यवहार फक्त कमी वर्दळीच्या वेळेत (सकाळी १० पूर्वी, दुपारी १ ते ५, रात्री ९.३० नंतर) होणार.
  • पेमेंट अयशस्वी झाल्यास संधी कमी: UPI पेमेंट फेल झाल्यास ते पुन्हा तपासण्याची केवळ ३ संधी, प्रत्येक प्रयत्नात ९० सेकंदांचे अंतर आवश्यक.
  • पैसे पाठवताना नाव स्पष्ट: पैसे पाठवताना रिसिव्हरचे नाव स्क्रीनवर दिसणार, चुकीच्या खात्यावर पैसे जाण्याची शक्यता कमी होणार.

बँकिंग कायदा सुधारणा लागू

बँकिंग सुधारणा कायदा आजपासून लागू झाला असून, त्यामध्ये:

  • बँकेचे प्रशासन अधिक पारदर्शक बनवण्यावर भर
  • सहकारी बँक संचालकांच्या कार्यकाळात वाढ
  • सरकारी बँकांतील न मागितलेली रक्कम ‘गुंतवणूकदार संरक्षण निधी’मध्ये हस्तांतरित करण्यास परवानगी
  • लेखापरीक्षण प्रक्रियेत सुधारणा

UPI व्यवहारांवर GST नाही

UPI व्यवहारांवर GST लावण्याची कोणतीही योजना सरकारच्या विचारात नाही, अशी स्पष्टोक्ती अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी २२ जुलै रोजी राज्यसभेत दिली आहे. २००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI व्यवहारांवरही GST लागू नसेल.

LPG गॅस दरात बदल – व्यावसायिक सिलेंडर स्वस्त

तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमतीत ३३.५० रुपयांची कपात केली आहे.
नवीन दरानुसार दिल्लीमध्ये सिलेंडरची किंमत आता १६३१.५० रुपये झाली आहे.

मात्र, घरगुती सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी दराचा आढावा घेतला जातो, पण यावेळी कपात फक्त व्यावसायिक सिलेंडरपुरतीच मर्यादित आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!