ध्यास विश्वसार्ह बातमीचा

खंडणी प्रकरणात मराठी अभिनेत्री अडचणीत; दोन महिलांना अटक

मुंबई वृत्तसंस्था : मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने गोरेगाव येथील एका बिल्डरकडून तब्बल 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून दोन महिलांना अटक केली आहे. या प्रकरणात मराठी अभिनेत्री हेमलता पाटकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपी महिलांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कांदिवली येथील रहिवासी हेमलता आदित्य पाटकर उर्फ हेमलता बाणे (वय 39) आणि सांताक्रूझ येथील अमरिना इक्बाल झवेरी उर्फ एलिस उर्फ अमरिना मॅथ्यू फर्नांडिस (वय 33) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख पटली आहे. हेमलता पाटकर या मराठी अभिनेत्री असून, त्यांच्या विरोधात यापूर्वीही मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली.

अभियोजन पक्षानुसार, खंडणीची रक्कम कशी द्यायची होती याचा सविस्तर लेखी पुरावा तक्रारदाराने सादर केला आहे. तसेच हेमलता पाटकर यांचे हस्ताक्षराचे नमुने आणि अमरिना झवेरी यांचे आवाजाचे नमुने अद्याप घेणे बाकी असल्याने तपासासाठी वाढीव पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दोन्ही आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचा दावाही करण्यात आला आहे.

गोरेगाव पश्चिम येथील बांधकाम व्यावसायिक अरविंद गोयल यांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या मुलावर दाखल असलेला फौजदारी खटला मिटवून देण्याच्या बदल्यात आरोपींनी 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली. या तक्रारीनंतर गुन्हे शाखेने कारवाई करत हे प्रकरण उघडकीस आणले असून, खंडणीच्या या रॅकेटमध्ये आणखी आरोपी सामील असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!