सोलापूर वृत्तसंस्था
सोलापूर – माळशिरसमधील मारकडवाडीमध्ये आज बॅलेट पेपरवर मतदान होणार आहे. पण याला प्रशासनाचा विरोध असून इथे कलम 144 लागू करण्यात आले. तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर यांना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत गावातून कमी मतदान झाल्याने गावकऱ्यांकडून EVM वर संशय व्यक्त करण्यात आला होता. तर भाजपच्या राम सातपुतेंना गावातून चांगले मताधिक्य भेटले.
‘ईव्हीएम’वर (EVM) आक्षेप घेत सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीने बॅलेट पेपरवर मतदान प्रशासनाने परवानगी नाकारल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने २ डिसेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान गावात जमावबंदीचा आदेश लागू केला असून, गावातील २० ते २५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा दिल्या आहेत. मतदान आज (३ डिसेंबर) बॅलेट पेपरवर घेतले जाणार आहे. मात्र ‘आमच्यावर लाठीचार्ज झाला, गोळ्या जरी चालवल्या तरी आम्ही बॅलेट पेपरवर मतदान घेण्यावर ठाम आहोत,’ अशी आक्रमक भूमिका मारकडवाडी ग्रामस्थांनी घेतली आहे.
मारकडवाडी गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम आहे, तर गावकरीही मतदान घेण्यावर अडून बसलेले आहेत. त्यामुळे प्रशासनापुढेही मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यावर काय तोडगा काढला जातो, याची उत्सुकता आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मिळालेल्या मतांवर मारकडवाडी ग्रामस्थांचा आक्षेप आहे. आमच्या गावातून आमदार उत्तम जानकर यांना जादा मतदान झाले आहे, अशी भूमिका घेऊन मारकडवाडी ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली होती. त्याचा संपूर्ण खर्च करण्याची तयारीही ग्रामस्थांनी दाखवली होती.
माळशिरसच्या तहसीलदारांकडे गावकऱ्यांनी खर्चाची रक्कम भरून फेरमतदानाची प्रक्रिया राबविण्याची विनंती केली होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने ती मागणी फेटाळली आहे. जिल्हा प्रशासनाने मागणी फेटाळली असली तरी मारकडवाडी ग्रामस्थ बॅलेट पेपरवर मतदान घेण्यावर ठाम आहेत. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने मारकडवाडीत जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. तसेच, आमदार उत्तम जानकर गटाच्या २० ते २५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा दिल्या आहेत. गावात एकूण २४७६ मतदान असून, विधानसभा निवडणुकीत १९०५ मतदान झाले आहे. त्यात राम सातपुते यांना १००३, तर उत्तम जानकर यांना ८४३ मतदान झाले आहे. आमच्या गावात १६५ मतांचा फरक झाला आहे. सातपुते यांना मताधिक्य गेल्याने आम्ही बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. आतपर्यंत जानकर आणि मोहिते- पाटील यांना गावाने मताधिक्य दिले आहे, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
याबाबत मारकडवाडी ग्रामस्थ म्हणाले, काहीही झाले तरी आम्ही आज (३ डिसेंबर) बॅलेट पेपरवर मतदान घेणार आहोत. लाठीचार्ज झाला, डोकी फुटली, रक्तबंबाळ झालं, गोळ्या जरी चालवल्या तरी आम्ही प्रशासनाच्या पुढे झुकणार नाही. कोणालाही त्रास न देता आम्ही बॅलेट पेपरवर मतदान घेणार आहोत. सकाळी आठपासून आम्ही मतदानाची प्रक्रिया राबविणार आहोत. या प्रक्रियेला आमदार उत्तम जानकर यांचा पाठिंबा आहे. गुन्हे दाखल झाले तरी आम्ही मतदान घेण्यावर ठाम आहोत. प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावे, आम्ही त्यांना सहकार्य करू, असेही ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
याबाबत आमदार उत्तम जानकर म्हणाले, मारकडवाडी ग्रामस्थ स्वखर्चाने बॅलेट पेपरवर मतदान घेणार असतील तर प्रशासनाला काय आक्षेप आहे? प्रशासनाकडून ग्रामस्थांवर लाठीचार्ज करण्यात आला तर त्याचा संपूर्ण महाराष्ट्रात उद्रेक होईल, असा इशाराही त्यांनी दिला. मारकरवाडी (ता. माळशिरस) गावचे पुन:श्च मतदान घेणे आणि ती घेण्याची मागणी करणे ही निव्वळ स्टंटबाजी आहे, असे मत माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केले. मारकरवाडीचे मतदान घेऊन ईव्हीएमबद्दल गैरसमज पसरवण्याचा हेतू असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे असे हे नरेटिव्ह मेसेज पसरवण्याचा त्यांचा हेतू आहे. पण हे अशक्य आहे. निवडणूक आयोग, प्रशासन त्यांना कदापि मान्यता देणार नाही. मतदान होणार नाही, असे राम सातपुते यांनी ठामपणे सांगितले.
मारकडवाडी ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर गावाला प्रत्यक्ष मतदानापूर्वीच सोमवारी (ता. २) पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. गावकऱ्यांनी मतदानाची जोरदार तयारी केली आहे. विधानसभा निवडणुकीत असतात तशाच कागदावर मतपत्रिका तयार केल्या असून, मतपेट्याही तयार केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत ज्यांनी ज्या उमेदवाराला मतदान केले, त्यांनाच पुन्हा मतदान करण्याचा प्रचार करण्यात येत आहे. मतदानासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर भव्य मंडप उभारण्यात आला आहे. राज्यभरातील माध्यमांच्या प्रतिनिधींची येथे गर्दी होऊ लागली आहे.