ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यातील दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; १५ कामगार ठार, अनेक गंभीर

नागपूर :  वृत्तसंस्था 

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात राऊळगावजवळ असलेल्या एसबीएल एनर्जी लिमिटेड या दारुगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीत आज (रविवार) सकाळी भीषण स्फोट होऊन किमान १५ कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राऊळगाव लगतच्या येनवरा गावाजवळील कंपनीच्या प्रकल्पात सकाळी सुमारे ७ वाजता डिटोनेटर निर्मिती विभागात अचानक स्फोट झाला. या प्रकल्पात डेटोनेटर्स, स्लरी एक्सप्लोजिव्ह, कास्ट बूस्टर्स आणि सिजमिक एक्सप्लोसिव्ह्सचे उत्पादन केले जाते. स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज परिसरात दूरवर ऐकू आला आणि संपूर्ण युनिट हादरून गेले.

घटनेच्या वेळी कंपनीच्या विविध युनिटमध्ये ३० हून अधिक कर्मचारी कार्यरत होते. स्फोटानंतर काही युनिटमध्ये आग लागली. घटनास्थळी मोठा ढिगारा निर्माण झाला असून काही कामगार त्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी १५ जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. जखमींची अचूक संख्या अद्याप स्पष्ट झालेली नसून बचावकार्य सुरू आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी नागपूर शहरातील विविध रुग्णालयांत हलविण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. कंपनीचे बचाव पथक आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा ढिगारा हटवून अडकलेल्या कामगारांचा शोध घेत आहेत.

दरम्यान, काटोल तालुक्यात शोककळा पसरली असून मृत कामगारांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्फोटाचे नेमके कारण काय, सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून उच्चस्तरीय चौकशीचे संकेत देण्यात आले असून औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!