---Advertisement---

मृत्यूतही न तुटले साथ-संबंध; वृद्ध दांपत्याचा एकाच दिवशी अंत, एकाच सरणावर अंत्यसंस्कार

By team
On: March 1, 2026 10:48 AM
Follow Us:
---Advertisement---

भंडारा :  वृत्तसंस्था 

‘जन्मोजन्मीची साथ’ ही केवळ साहित्य किंवा चित्रपटापुरती मर्यादित नसून ती वास्तवातही अनुभवता येते, याचा प्रत्यय भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील सोरना गावात आला. येथील लखाराम सिताराम शहारे (वय ८६) आणि जैतुराबाई लखारामजी शहारे (वय ८०) या वृद्ध दांपत्याने मृत्यूतही एकमेकांची साथ सोडली नाही. पतीच्या निधनानंतर अवघ्या आठ तासांतच पत्नीनेही जगाचा निरोप घेतल्याने संपूर्ण परिसर हळहळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोरना येथील हे दांपत्य अनेक वर्षे शांत, समाधानी व आनंदी संसार करत होते. वृद्धापकाळामुळे लखाराम शहारे यांची प्रकृती काही दिवसांपासून खालावली होती. अखेर त्यांचे निधन झाले. घरातील आधारवड हरपल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

पतीच्या निधनाचा मोठा धक्का त्यांच्या पत्नी जैतुराबाई यांना बसला. पतीचा मृतदेह घरात असतानाच, विरह असह्य झाल्याने अवघ्या आठ तासांच्या अंतराने त्यांनीही अखेरचा श्वास घेतला. एकाच दिवशी कुटुंबातील दोन ज्येष्ठ व्यक्तींचे निधन झाल्याने गावात शोककळा पसरली.

या घटनेनंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी भावनिक निर्णय घेत दोघांवर एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले. आयुष्यभर एकमेकांना साथ देणाऱ्या या दांपत्याचा अखेरचा प्रवासही एकत्रच पार पडला. अंत्यसंस्कारावेळी उपस्थित ग्रामस्थांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. “मृत्यूलाही या जोडीला वेगळे करता आले नाही,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. या घटनेमुळे संपूर्ण तुमसर तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, प्रेम, निष्ठा आणि आयुष्यभराची साथ याचे हृदयस्पर्शी उदाहरण म्हणून या दांपत्याची कथा स्मरणात राहणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!