मुंबई : वृत्तसंस्था
देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतांना ठाकरे गटाच्या नेत्यांवर मात्र ईडी कारवाईचा ससेमिरा सुरू झाला आहे. ठाकरे गटाचे बडे नेते सूरज चव्हाण सध्या अटकेत आहेत. तर किशोरी पेडणेकर, रविंद्र वायकर यांचीही चौकशी सुरू आहे. या कारवायांवरुन ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानाचीही घोषणा केली.
“ज्या पद्धतीने जनता न्यायालय पार पडले, मग सूडबुद्धीने या कारवाया सुरू झाल्या. वायकर साहेबांनी शिंदे गटाकडे जायचं ठरवलं असतं तर कारवाई बंद झाली असती. किशोरी पेडणेकर यांच्यावरदेखील सूडबुद्धीने कारवाई झाली, असे आरोप सुषमा अंधारे यांनी केले. तसेच राम सगळ्यांचे श्रद्धास्थान आहेत. पण महाराष्ट्राचे प्रश्न बाजूला पाडतायत,” असे म्हणत राममंदिरावरुनही अंधारेंनी भाजपवर निशाणा साधला.
यावेळी सुषमा अंधारेंनी ३० तारखेपासून मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियान सुरू होत असल्याची मोठी घोषणा केली. ३० जानेवारी ते ३ मार्च पर्यंत म्हणजे ३५ दिवस हे अभियान सुरू राहणार आहे. या अभियानाअंतर्गत ८३० किलोमीटरचे अंतर पार करत १३ लोकसभा २७ विधानसभा कव्हर केली जातील. तसेच ७० लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले आहे.”या संपूर्ण अभियानात हॉटेल वगैरे अशा सुविधा न घेता टेंटमध्ये राहणार आहे. स्वतः बनवून खाणार असून बुलढाणा, सिंदखेड राजा, रीसोल, वाशिम, हिंगोली, परभणी असा दौरा करत मुंबईपर्यंत येणार आहे. तसेच समारोपाच्या दिवशी समारोप सभेला. उद्धव ठाकरे उपस्थितीत असतील. या दौऱ्यात संजय राऊत, आदित्य ठाकरे, भास्कर जाधव यांच्याही सभा अधूनमधून होतील,” असे सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले आहे.