नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) जागावाटपाची घोषणा करणार आहेत. तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. तिन्ही पक्षांचे नेते मुंबईत गुरुवारी जागांची घोषणा करणार आहेत. त्यानुसार शिवसेनेला २०, काँग्रेस १८, राष्ट्रवादी कॉग्रेस ८, तर प्रकाश आंबेडकर यांनाही काही जागा मिळण्याची शक्यता आहे.
काही कारणास्तव प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडी यांच्यात आघाडी झाली नाही, तर त्या जागा काँग्रेसला मिळतील. वंचितसोबतची आघाडी आमच्याकडून तोडली जाणार नाही, अशी रणनीती महाविकास आघाडीने आखली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या निर्णयाची शेवटपर्यंत प्रतीक्षा केली जाणार आहे. दिल्लीत झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत काँग्रेसने १८ जागांवर चर्चा केली. काँग्रेसची तिसरी यादी गुरुवारीच येण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली येथे काँग्रेस मुख्यालयात झालेल्या बैठकीला काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी केंद्रीय मंत्री अंबिका सोनी, सलमान खुर्शीद, मधुसूदन मिस्त्री, पी. एल. पुनिया, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात उपस्थित होते.