मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्रात गुटखा व तत्सम प्रतिबंधित पदार्थांवर पूर्ण बंदी घालण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात येणार आहे. गुजरातमध्ये लागू असलेल्या दारूबंदी कायद्याच्या धर्तीवर अभ्यास करून आवश्यक प्रस्ताव सादर करत कायद्याचा मसुदा तयार करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले आहेत.
गुटखा व प्रतिबंधित अन्नपदार्थांवरील कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे प्रधान सचिव धीरज कुमार, अन्न व औषध प्रशासन आयुक्त श्रीधर दुबे पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यात गुटखा व प्रतिबंधित अन्नपदार्थांची अवैध विक्री रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अन्न व औषध प्रशासन व गृह विभागाच्या संयुक्त पथकाची स्थापना करण्याची घोषणा केली होती. तसेच अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला होता, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
या पार्श्वभूमीवर गुजरातच्या दारूबंदी कायद्याच्या धर्तीवर गुटखाबंदीसाठी स्वतंत्र कायदा तयार करून तो येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्याचे निर्देश मंत्री झिरवाळ यांनी दिले. राज्यात गुटखा व तत्सम प्रतिबंधित पदार्थांचे उत्पादन, वितरण आणि विक्री आधीच बंद असली तरी अवैध व्यवहारांवर अधिक कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी कायद्यात आवश्यक दुरुस्त्या करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुटखा विक्री व तस्करीशी संबंधित गुन्ह्यांनाही ‘मकोका’च्या कक्षेत आणण्यासाठी कायदा अधिक कठोर केला जाणार असून, विशेषतः शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात अशा प्रतिबंधित पदार्थांची विक्री आढळल्यास तातडीने व कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आल्याचेही मंत्री झिरवाळ यांनी सांगितले.