ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पोलिसांच्या छापेमारीत सापडले २००० कोटींचे एमडी

पुणे : वृत्तसंस्था

शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सोमवारी रात्रीपासून शानोरी व कुरकुंभ परिसरात छापेमारी करून ११०० कोटी रुपये किमतीचे ५७५ किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त केले. तर मंगळवारी नवी दिल्लीत छापा टाकून तब्बल ८०० कोटी रुपये किमतीचे एमडी जप्त केले. या विभागाने गेल्या २४ तासांत सुमारे २ हजार कोटी रुपये किमतीचे ९५० किलो अमली पदार्थ जप्त करून एक अनोखा विक्रम नोंदवला आहे. देशातील अमली पदार्थ तस्करीतील बड्या हस्ती या रॅकेटचे सूत्रधार असून त्यांच्या शोधासाठी अमली पदार्थ प्रतिबंधक संचालनालयाच्या (एनसीबी) सहाय्याने संपूर्ण देशभरात तपास जारी करण्यात आला आहे.

पुणे शहरात रविवारी मध्यरात्री शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (युनिट एक) तीनजणांना अटक करून साडेतीन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक वसाहतीतील कारखान्यावर छापेमारी करून एक हजार कोटी रुपये किमतीचे ५०० किलो एमडी जप्त केले तत्पूर्वी विश्रांतवाडीतून १०० कोटी रुपये किमतीचे ५० किलो एमडी जप्त करण्यात आले. दरम्यान, कुरकुंभ येथील कारखान्यात तयार केलेला कच्चा माल पुण्यातून मीरा भाईंदर, मुंबई, पश्चिम बंगाल व नेपाळमार्गे विदेशात
पाठवण्यात येत असल्याची माहिती तपासात पुढे आली.

त्यानंतर दिल्ली येथील कारखान्याचीही माहिती पुढे आली. त्यानुसार शहर गुन्हे अन्वेषण विभागाचे (युनिट १) वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद व खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे व त्यांच्या पथकांनी तातडीने दिल्ली गाठून त्या कारखान्यावर छापा टाकला. तेथून तब्बल ८०० कोटी रुपये किमतीचे ४०० किलो एमडी जप्त करण्यात आले. पंचांसमक्ष या अमली पदार्थांचा पंचनामा करण्यात आला. त्यासंदर्भात तेथील दोनजणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दिल्लीबरोबरच आणखी काही ठिकाणच्या कारखान्यांची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून तेथेही छापेमारी जारी करण्याची पोलिसांची तयारी सुरू आहे. तेथेही शेकडो कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या रॅकेटसंदर्भात मुंबई व दिल्लीमधील सॅम आणि ब्राऊ नावाच्या दोनजणांचा कसून शोध जरी करण्यात आला आहे. कुरकुंभमधील कारखान्यात तयार केले जाणारे मेफेड्रोन या दोनजणांमार्फत संपूर्ण देशभरामध्ये आणि विदेशात वितरित केले जाणार होते. भारतात ड्रग्ज तस्करीचे रॅकेट चालवणारे बडे तस्कर यामध्ये सहभागी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!