ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थीनीने संपविले आयुष्य ; वसतिगृह संचालकाविरोधात गुन्हा दाखल !

नांदेड : वृत्तसंस्था

नांदेड शहरालगतच्या सिडको परिसरातील वैद्यकीय महाविद्यालयात बीएचएमएसच्या विद्यार्थिनीने खासगी वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव जीवन घोगरे पाटील यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा तसेच अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मृत विद्यार्थिनीचे नाव आकांशा मुंजाजी गायकवाड (रा. वाजेगाव) असून ती हडको येथील पद्मश्री श्यामराव कदम होमिओपॅथी महाविद्यालयात बीएचएमएस द्वितीय वर्षात शिकत होती. ती महाविद्यालयालगत असलेल्या जीवन घोगरे पाटील यांच्या निवासस्थानी असणाऱ्या खासगी वसतिगृहात वास्तव्यास होती. शुक्रवारी दुपारी तिने आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

माहितीनुसार, आकांशाच्या वसतिगृहाची 8-10 महिन्यांची फी बाकी होती, आणि फी भरण्यासाठी जीवन घोगरे पाटील तिला वारंवार मानसिक त्रास देत होते. सततचा तगादा आणि होणाऱ्या छळाला कंटाळून आकांशाने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेनंतर सिडको ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. घटनेनंतर तिच्या नातलगांनी वसतिगृह चालकावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी तपासणी करून शवविच्छेदन अहवाल आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यामुळे तणाव निवळला.

घटनेच्या ठिकाणी सुमारे 40-50 विद्यार्थीनी वास्तव्यास आहेत, परंतु वसतिगृह अनधिकृत असल्याचा दावा केला जात आहे. या घटनेनंतर नियमांचे उल्लंघन, सुरक्षा उपाययोजनांचा अभाव आणि विद्यार्थिनींची सुरक्षितता या मुद्द्यांवर प्रशासनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या दुःखद घटनेमुळे शैक्षणिक संस्थांमध्ये वसतिगृह व्यवस्थापन आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसंबंधी कठोर उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!