ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापुरात प्रथमच जलपरी शो; गड्डा यात्रेचे खास आकर्षण

सोलापूर : वृत्तसंस्था

सलग तीन दिवसांची सुट्टी मिळाल्याने सोलापूरच्या प्रसिद्ध सिद्धेश्वर गड्डा यात्रेत नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. विद्युत रोषणाईने सजलेले गगनचुंबी आकाश पाळणे, डिस्नेलँड, विविध झोपाळे, पन्नालाल गाढव तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल्स यामुळे होम मैदान परिसर चैतन्याने फुलून गेला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण यात्रेचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत.

शनिवार (दि. २४), रविवार (दि. २५) व सोमवार (दि. २६) अशी सलग शासकीय सुट्टी जुळून आल्याने सहकुटुंब गड्डा यात्रेत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. यंदा गड्डा यात्रेत विशेष आकर्षण ठरला आहे सोलापुरात प्रथमच सादर करण्यात आलेला ‘जलपरी शो’. पाण्याने भरलेल्या विशेष काचेच्या टँकमध्ये जलपरीचे सजीव सादरीकरण, तिची जलक्रीडा, नृत्य आणि कलात्मक हालचाली पाहण्यासाठी यात्रेत प्रेक्षकांची मोठी गर्दी होत आहे. संध्याकाळच्या सत्रात या शोसाठी विशेष उत्सुकता दिसून येत असून, लहान मुले जलपरीला प्रत्यक्ष पाहून भारावून जात आहेत. पालकही कुटुंबासह हा अनोखा शो पाहण्यासाठी आवर्जून भेट देत आहेत.

मोबाईल कॅमेऱ्यात हे क्षण टिपण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू असून, जलपरी शोमुळे गड्डा यात्रेला आधुनिकतेची व मनोरंजनाची नवी झळाळी मिळाली आहे. दरवर्षीप्रमाणे झोपाळे, खेळणी व खाद्यपदार्थांची रेलचेल असली तरी यंदा जलपरी शोमुळे सिद्धेश्वर गड्डा यात्रेचे वेगळेपण अधोरेखित झाले आहे. सुरक्षित आणि नाविन्यपूर्ण मनोरंजन देण्याच्या उद्देशाने हा शो सोलापुरात प्रथमच सादर करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!