नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने १५ राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामध्ये गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे.
राजस्थानच्या अलवर, चित्तोडगड, कोटा, पाली, बांसवाडा आणि कुचमन-दिडवाना येथील मौलासरमध्ये सोमवारी संध्याकाळी पाऊस झाला. चित्तोडगडमध्ये वीज पडून एका तरुणाचा मृत्यू झाला, तर एकाच कुटुंबातील 5 जण दगावले. बिहारमधील पाटणा, औरंगाबाद, जहानाबाद, रोहतास आणि बक्सरमध्येही काल पाऊस झाला. बक्सरच्या नवानगरमध्ये वीज पडून तीन जणांचा मृत्यू झाला, तर रोहतासच्या नोखा येथे वीज पडून एकाचा मृत्यू झाला.
सोमवारी हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील गांभारपुल येथे दुपारी अडीच वाजता ढग फुटले. त्यामुळे 7-8 मिनिटे जोरदार पाऊस झाला. कुनिहार ते नालागढला जोडणाऱ्या महामार्गावर ढिगारा पडला. पुरात दोन वाहनांचेही नुकसान झाले. मान्सूनने अर्धा भारत व्यापला आहे. येत्या १५ दिवसांत संपूर्ण मध्य प्रदेश व्यापेल, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तर राजस्थानमध्ये तो उद्या एंट्री घेऊ शकतो.