म्हेत्रेंनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट : शेतकरी व दुष्काळप्रश्नी झाली चर्चा
विविध उपाययोजनांची केली मागणी
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे अक्कलकोट मतदारसंघात भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर विविध समस्यांविषयी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेत विविध उपाययोजनांची मागणी करत निवेदन सादर केले.
यावेळी सविस्तर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.अक्कलकोट तालुक्यातील बहुतांश शेतकरी हे खरीप हंगामातील पिके घेतात.परंतु मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे सर्वच खरीप पिके वाया गेल्याने पुर्ण पीक विमा मिळावा,सोयाबीनची उर्वरित पीक विम्याची रक्कम त्वरित द्यावी,अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दुष्काळाचे सर्व उपाययोजना लागु करण्यात याव्यात,वीज बिल पुर्णपणे माफ करण्यात यावे,पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावांचे तात्काळ सर्वेक्षण करुन पाणी टॅंकर,चारा छावण्या सुरू करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही व्हावी,चेन्नई-सुरत ग्रीनफिल्डच्या बाधित शेतकऱ्यांना समाधानकारक मोबदला मिळावा यांसह इतर मागण्या म्हेत्रे यांच्या शिष्टमंडळाने केल्या.यावेळी माजी सभापती सिध्दार्थ गायकवाड, सिध्दाराम भंडारकवठे,सोमनाथ चिकलंडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
अक्कलकोट हा दुष्काळी नव्हे तर दुष्काळसदृश तालुका
माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत अक्कलकोट हा दुष्काळी नव्हे तर दुष्काळसदृश तालुका यादीत असल्याची माहिती देण्यात आली.म्हेत्रे यांनी दुष्काळी सवलतींविषयी शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळण्यासंदर्भात मागणी केली.यावर जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी तसा अहवाल पाठवुन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.जिल्ह्यातील चारच तालुके यापूर्वी दुष्काळी जाहीर करण्यात आले आहेत.यामध्ये अक्कलकोट तालुक्याचा समावेश नाही.