कोल्हापूर : वृत्तसंस्था
यमगे, ता. कागल गावच्या हद्दीत गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वडाचा माळा वर कोंबड्यांच्या झुंजी लावण्याचा प्रकार उघडकीस आला, या बेकायदेशीर झुंजी लावून त्यावर लाखो रुपयांचा सट्टा लावला जात होता. या आगळ्यावेगळ्या खेळात सुमारे अडीचशे लोक सहभागी झाले होते. कोल्हापूर आणि मुरगूड पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकताच आपल्या गाड्या तिथेच टाकून अनेकांनी वाट दिसेल तिकडे सैरावैरा धावण्यास सुरुवात केली. त्यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता.
मुरगूडपासून दोन किमी अंतरावर असणाऱ्या यमगे या गावाच्या हद्दीत वडाचा माळ या ठिकाणी दुपारी बारापासून वेगवेगळ्या गाडीतून अनेक तरुण येत होते. यामध्ये सांगली, सातारा, पुणे आदी जिल्ह्यांतून आलेले तरुण मोठ्या प्रमाणात होते. अनेकांनी या आलिशान गाड्यांतून दोन ते पाच फुटांपर्यंत उंच असे कोंबडे आणले होते. या कोंबड्यांच्या झुंजी लावून यावर। मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जात होता. विजयी कोंबडा मालक यांना आयोजकांकडून पाच ते दहा हजार बक्षीस दिले जाते.