मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील ओबीसी समाजासाठी गेल्या काही महिन्यापासून लढा देणारे व राज्यातील मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील 3 आरोपींनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी यासंबंधीचा आपला अर्ज मुंबई स्थित विशेष न्यायालयात दाखल केला आहे. त्यावर न्यायालयाने सुनावणी घेण्याची तयारी दर्शविली आहे.
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी सुनील नाईक, सुधीर साळसकर व अमित बलराज हे 3 आरोपी तुरुंगात आहेत. या तिन्ही आरोपींनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अन्य आरोपींना दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला आहे. पण या आरोपींनी ही सुनावणी थांबवून आमच्या माफीचा साक्षीदार होण्याच्या अर्जावर निर्णय घेण्याची विनंती कोर्टाकडे केली आहे. विशेष म्हणजे कोर्टानेही त्यांची ही विनंती मान्य केली आहे.
सदर तिन्ही आरोपींनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाचे न्यायमूर्ती राहुल रोकडे यांच्यापुढे आपला माफीचा साक्षीदार होण्याचा अर्ज सादर केला होता. या अर्जावर 20 डिसेंबरच्या सुनावणीत उत्तर सादर करण्याचे निर्देश ईडीला देण्यात आले होते. मंत्री छगन भुजबळ हे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत.