ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मंत्री गडकरींची मोठी घोषणा : अमेरिकेच्या तोडीस तोड होतील देशात रस्ते !

मुंबई : वृत्तसंस्था

येत्या दोन वर्षांत संपूर्ण देशभरातील महामार्गांच्या पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा निर्धार केंद्र सरकारने केला आहे. यासाठी 10 लाख कोटी रूपयांची मोठी गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

गडकरी म्हणाले की, विशेषतः ईशान्य भारतातील रस्त्यांचे जाळे अमेरिकेतील रस्त्यांच्या तोडीस तोड असेल. देशात आगामी दोन वर्षांत 10 लाख कोटी रूपयांच्या प्रकल्पांचे काम सुरू होणार असून, त्यात ईशान्य भारत व सीमावर्ती भागांवर विशेष भर असेल.  ईशान्य भारतातील खडतर भौगोलिक रचना आणि सीमावर्ती भागांतील महत्त्व लक्षात घेता, त्या भागातील रस्ते पायाभूत सुविधा भक्कम करणे अत्यावश्यक आहे. गडकरी यांनी स्पष्ट केले की, एकूण 21,355 किमी लांबीच्या 784 महामार्ग प्रकल्पांवर काम होणार असून, यासाठी 3.73 लाख कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पांमध्ये रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, NHAI आणि NHIDCL चा समावेश आहे.

सध्या केवळ आसाममध्ये 57696 कोटींचे, बिहारमध्ये 90000 कोटींचे, पश्चिम बंगालमध्ये 42000 कोटींचे, झारखंडमध्ये 53000 कोटींचे आणि ओडिशामध्ये 58000 कोटींचे प्रकल्प कार्यान्वित आहेत. आसाम वगळता ईशान्य भारतात याच आर्थिक वर्षात 1 लाख कोटींच्या प्रकल्पांवर काम सुरू आहे,” असेही गडकरी यांनी सांगितले. नागपूरमध्ये 170 कोटींच्या खर्चातून एक पायलट मास रॅपिड ट्रान्सपोर्ट प्रकल्प सुरू असून, त्यात 135 आसनांची बस प्रदूषणमुक्त इंधनावर धावणार आहे. हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास देशभरात विशेषतः दिल्ली-जयपूर मार्गावर बीओटी मॉडेलनुसार अशी सेवा लागू करण्यात येणार आहे.

गडकरी यांनी सांगितले की, देशातील राष्ट्रीय महामार्गांचे जाळे 2014 मध्ये 91,287 किमी होते ते आता 1,46,204 किमीवर पोहोचले आहे. दोन लेनपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांचा हिस्सा 30 टक्क्यांवरून 9 टक्क्यांवर आला आहे.  2024–25 मध्ये NHAI ने 5,614 किमी राष्ट्रीय महामार्गांचे बांधकाम पूर्ण केले असून, त्याने आपले 5,150 किमीचे लक्ष्य ओलांडले आहे. देशाची पायाभूत रचना जगातील सर्वोत्तम दर्जाशी साजेशी बनवण्याचा आमचा निर्धार आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!
Join WhatsApp Group