मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी काळात स्थानिक निवडणुकीसाठी सर्व पक्षीय नेते सक्रीय झाले असून त्यासाठी दिग्गज नेत्यांच्या भेटी गाठी देखील सुरु झाल्या आहे तर आज शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भेटीचे नेमके कारण समोर आले नसले तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसंदर्भात ही भेट झाल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्रात पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फड रंगणार आहे त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. त्यानुसार आज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकाळीच शिवतीर्थावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. उदय सामंत सकाळी सकाळीच राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचल्यामुळे राजकीय राजकीय विश्लेषकांनी आपल्या भुवया उंचावल्या. ही राजकीय नव्हे तर सदिच्छा भेट असल्याचा दावा केला जात आहे.
मनसेने लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला. पण एकनाथ शिंदे यांच्या विरोधामुळे मनसेला महायुतीत येता येऊ शकले नाही. यावरून मनसे व शिवसेनेत काहीही कटूता निर्माण झाली आहे. ही कटूता दूर करण्यासाठी उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. पण त्याचवेळी काही विश्लेषकांनी शिवसेना मुंबई महापालिकेचे राजकीय गणित पाहून राज ठाकरेंशी युती करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांमुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तब्बल 8 उमेदवार पराभूत झाले होते. त्याची भविष्यात पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून शिवसेना मनसेशी जुळवून घेत असल्याचीही चर्चा आहे.