ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मंत्री शिरसाट यांच्या लेकाचे कारनामे : विवाहित महिलेने केले गंभीर आरोप !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर आरोप केले आहेत. सोशल मीडियावरून ओळख झाल्यानंतर प्रेमसंबंध, बौद्ध पद्धतीने विवाह, गर्भधारणा आणि जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याचा दावा महिलेने कायदेशीर नोटीसमध्ये केला आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सिद्धांत शिरसाट अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अशातच आता या प्रकरणावरून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाठ आणि महिला आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

संजय शिरसाट हे मंत्री असल्यामुळे पोलीस कार्यवाही करत नसून, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही या कायदेशीर नोटीसमध्ये करण्यात आला आहे. याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे

तसेच, माजी खासदार इम्तियाज जलील याबाबत म्हणाले की, दुर्दैव याचे वाटते की, एका मंत्राच्या मुलाने तिसरे लग्न केले आणि ज्या मुलीशी लग्न केले त्या मुलीला आता धमकवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वकिलांनी त्या मुलाला नोटीस पाठवलेली आहे. मग सगळे लोक गप्प का आहेत? आम्ही असं केलं असतं तर अख्खा मिडिया घरासमोर जमला असता, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

महिला आयोगाला आम्ही विनंती करणार आहे की, तुम्ही आताही गप्प बसणार आहात का? रुपाली चाकणकर ताईंना आम्ही हात जोडून विनंती करत आहोत की, ताई ती मुलगी मुंबईमध्येच राहते. तिला जाऊन भेटा आणि तिला न्याय द्या, अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

सिद्धांत शिरसाटांसोबत २०२८ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. या ओळखीनंतर त्यांची मैत्री झाली आणि चेंबूर येथील एका फ्लॅटवर प्रत्यक्ष भेट झाली. याच फ्लॅटवर शारीरिक संबंध झाले. यानंतर सिद्धांत यांनी लग्नासाठी तगादा लावला. मात्र संबंधित महिला आधीच विवाहित होती. त्यामुळे सिद्धांत यांनी तिला भावनिक ब्लॅकमेल करुन, लग्न कर अन्यथा मी आत्महत्या करेन, असा आग्रह धरला. यानंतर सिद्धांतच्या भावनिक आवाहनवर विश्वास ठेवून दोघांनी लग्न केलं, असा दावा संबंधित महिलेने केला आहे.

दरम्यान, लग्न झाल्यानंतर सिद्धांतच्या वर्तनात बदल झाला. सिद्धांत यांनी चेंबूरमधील फ्लॅटमध्येच राहण्यास सांगून छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन जाण्यास नकार दिला. सिद्धांत यांचे यापूर्वीचे विवाह संबंध आणि इतर महिलांसोबत असलेले संबंध उघडकीस आल्यावर धमकी देण्यास सुरुवात केली. “तू जर पोलिसांकडे गेलीस तर मी आत्महत्या करेन आणि तुझे संपूर्ण कुटुंब उध्वस्त करेन” अशा धमक्याही देण्यात आल्या, असे आरोप महिलेने केले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!