मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती व महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना मंत्री पद दिल्यावरून राजकारण तापले आहे. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना न विचारता छगन भुजबळांना मंत्री केल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका बड्या नेत्याने केला आहे. या दाव्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या गोटात तर्कवितर्कांना उधाण आले असून, राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांनी वेळोवेळी आपली नाराजी बोलून दाखवली होती. या प्रकरणी त्यांनी पक्षाध्यक्ष अजित पवारांवरही टीका केली होती. पण त्यानंतर राष्ट्रवादीचे तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आणि मंत्रिमंडळातील एक जागा मोकळी झाली. या जागेवर गत 20 मे रोजी छगन भुजबळांची वर्णी लावण्यात आली. ही वर्णी अजित पवारांनीच लावण्यात आल्याचा दावा केला जात आहे. पण आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपने अजित पवारांना न विचारता छगन भुजबळांना संधी दिल्याचा आरोप केला आहे.
अजित पवारांना रात्री झोपही लागत नसेल
अजित पवारांचा भाजपसोबत अपमान सुरू आहे. भाजपने उपमुख्यमंत्री त्यांना न विचारता त्यांच्या पक्षाच्या छगन भुजबळ यांना मंत्री केले. त्यामुळे अजित पवारांना रात्री झोपही लागत नसेल. अजित पवार ज्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्या पक्षाच्या एका नेत्याला मंत्री करण्याचे आदेश दिल्लीतून येतात. मग अशावेळी काय करायचे? उद्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेत्यांबाबतही दिल्लीतून आदेश येतील. काही लोक त्या प्रयत्नांत देखील आहेत, असे संजय राऊत गुरूवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात विशेषतः सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ माजली आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे संजय राऊत यांनी नुकताच छगन भुजबळ हे आता भाजपमध्येच असल्याचे विधान केले होते. एकेकाळी भाजप एकही उपमुख्यमंत्री करण्यास तयार नव्हता. पण आता ते चार उपमुख्यमंत्री करू शकतात. ते गद्दारांसाठी नवीन घटना तयार करून एकापेक्षा जास्त मुख्यमंत्रीही करू शकतात. भाजपचे काही खरे नाही. छगन भुजबळ आता भाजपध्येच आहेत. ते अमित शहांच्या पक्षात आहेत. फक्त तांत्रिकदृष्ट्या ते दुसऱ्या गटात आहेत. त्यांनी अमित शहा यांचे नेतृत्व मान्य केले आहे.
ज्या अमित शहांनी शिवसेनेचे तुकडे केले. आता त्यांना मुंबई व महाराष्ट्र तोडायचा आहे. त्या पक्षात आता भुजबळ आहेत. हेच भुजबळ कधीकाळी मराठी माणसांसाठी व सीमा प्रश्नासाठी रस्त्यावर उतरले होते. पण भाजपशी सोयरिक केलेला नेता कितीही मर्द असला तरी कालांतराने तो सरपटणारा प्राणी होतो. भुजबळांनी मला मंत्री करम्यात अमित शहा, नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांचे योगदान असल्याचे विधान केले होते. त्यांनी अजित पवारांचे नाव घेतले नव्हते, असेही संजय राऊत या प्रकरणी बोलताना म्हणाले होते.