---Advertisement---

शिधापत्रिकाधारकांसाठी एक महत्वाची बातमी : एकाच महिन्यात मिळणार तीन महिन्यांचे धान्य !

By team
On: May 29, 2025 3:34 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पावसाळा तसेच महापुरासारख्या आपत्तीजन्य परिस्थितीत आता राज्यात शिधापत्रिकेवरील तीन महिन्यांचे अर्थात ऑगस्टपर्यंतचे धान्य जूनमध्येच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या धान्याची उचल ३१ मेपर्यंत करण्याचे आदेश देण्यात आले असून, जिल्ह्यात आतापर्यंत २१ टक्के धान्य गोदामांमधून उचलण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी दिली. त्यामुळे ग्राहकांनी जूनमध्ये आपल्या हक्काचे तीन महिन्यांचे धान्य एकत्रित घेऊन जावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

आगामी पावसाळा आणि परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे धान्याची कार्यक्षम वाहतूक आणि साठवणुकीसाठी राज्ये, तसेच केंद्रशासित प्रदेशांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता केंद्र सरकारने स्वतंत्र निर्देश दिले आहेत. त्यात लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्याचे वितरण करण्यासाठी राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा योजनेतील धान्यवाटपासाठी ऑगस्टपर्यंतच्या अन्नधान्याची आगाऊ उचल ३१ मेपर्यंत करून त्याचे वाटप ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार जूनच्या नियतनाची उचल जलद गतीने पूर्ण करावी व जुलै व ऑगस्टच्या नियतनाची उचल सुरू करावी, अशा सूचना पुरवठा विभागाला देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यांकडून पूर्ण क्षमतेने अन्नधान्याची उचल करण्यासाठी वाहनांची संख्या वाढविण्यात यावी. धान्याची उचल ही जलद गतीने होण्याकरिता, धान्याची उचल ही थेट वॅगनमधून करण्यात यावी. त्यासाठी सुटीच्या अर्थात शनिवारी व रविवारी भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामांमधून उचल देण्यात येणार आहे, असेही राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या दिवशी देखील अन्नधान्याची उचल करण्यात यावी. सुटीच्या दिवसाच्या एक दिवस अगोदर सुटीच्या दिवशी उचल करण्यात येणाऱ्या अन्नधान्याची माहिती महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापकांना उपलब्ध करून देण्यात यावी, जेणे करून महामंडळाला त्यानुसार व्यवस्था करणे शक्य होईल, असेही सुचविण्यात आले आहे.

सुधळकर म्हणाले, पावसाळ्यामुळे जून ते ऑगस्ट अशा तीन महिन्यांचे एकत्रित धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महामंडळाच्या गोदामांमधून धान्याची उचल सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात २७ मेपर्यंत एकूण धान्याच्या २१ टक्के उचल पूर्ण झाली आहे. हे धान्य एकूण १८५९ दुकानांपैकी ५३१ दुकानांमध्ये पोच करण्यात आले आहे. ही उचल करण्यासाठी ३१ मेपर्यंतची मुदत आहे. काही तांत्रिक कारणास्तव उचल थोडी पुढे जाऊ शकते. मात्र, सरकारच्या सूचनेनुसार ३० जूनपर्यंत तिन्ही महिन्यांचे धान्य वाटप करण्यात येईल. दरम्यान, मे महिन्याचे पोच केलेल्या धान्यापैकी ७२ टक्क्यांहून अधिक ग्राहकांना वितरित करण्यात आल्याचेही सुधळकर यांनी स्पष्ट केले.

 

महिनानिहाय धान्य वाटप– उचल (टनांमध्ये)

जून १२८९६–८१७०.८३

जुलै १२७८३–००

ऑगस्ट १४०४१–००

रेशन जोड

पुणे शहरातील धान्य वाटप– उचल

जून ६९४०.५० –४०००

जुलै ६९४१.१५–००

ऑगस्ट ६९४१.१५–००

एकूण उचल २५ टक्के

 

 

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!