ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लॉकडाऊनमध्ये शेतकर्‍यांकडून दंड वसूल करू नये, आमदार सुभाष देशमुख यांची मागणी

सोलापूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कडक लॉकडाऊनमध्ये शेतीकामाला सूट असतानाही शेतकर्‍याकडून पोलीस दंड वसूल करीत आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत तर जिल्हा प्रशासनाने या गोष्टीची दखल घेऊन शेतकर्‍यांवर कारवाई करू नये अशी मागणी द. सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी केली आहे.

आ. सुभाष देशमुख यांनी काल लोकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी तालुक्यातले सरपंच, उपसरपंच, भाजपाचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांशी कॉल कॉन्फरन्स च्या माध्यमातून संवाद साधला. या संवादात या लोकांनी आपल्या अडचणी मांडल्या. सध्या पावसाळा सुरू होत असून शेतकरी पेरणीपूर्व मशागत करण्यासाठी शेतात जात आहेत. तसेच खते, बी बियाणे यांच्या खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत पण पोलीस त्यांनाही अडवून पाचशे ते हजार रुपये दंड बसवत आहेत. अशाने शेतीची कामे करणे कठिण होईल अशा तक्रारी अनेकांनी या संवादाच्या माध्यमातून मांडल्या.

त्यांना उत्तर देताना आमदारांनी या तक्रारीची दखल घेतली आणि ही दंडाची कारवाई थांबवावी अशी मागणी करण्याचे आश्‍वासन दिले. आता राज्य सरकारने होम कॉरंटाईनची सोय बंद केली असल्याने सरकारी कॉरंटाईन सेंटर्सची संख्या वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे अशी तक्रार काही सरपंचांनी केली. त्यावर आमदारांनी बहुतेक गावांत कॉरंटाईन सेंटर सुरू करता येईल का याचा प्रयत्न प्रशासनाने करावा अशी मागणी केली.

लसीकरणाबाबत पुण्याला अधिक लस आणि सोलापूरला कमी लस असा प्रकार होत आहे तो थांबवावा यासाठी आपण वरच्या पातळीवर प्रयत्न करणार असल्याचेही आमदारांनी सांगितले. कोरोनाने ज्यांच्या घरातला कर्ता पुरुष मरण पावला असेल तर अशा घरातल्या निराधार झालेल्या मुलांना किंवा वृद्धांना सांभाळण्याची जबाबदारी आपण घेऊ तशी तयारीही त्यांनी दाखवली. एन टी पी सी च्या कॉरंटाईन सेंटरमध्ये परिसरातल्या गावातील रुग्णांना प्राधान्याने प्रवेश मिळावा अशीही मागणी त्यांनी केली.

सरपंचांना प्राधान्याने लस मिळावी, ज्यांना जाहीर केलेले अनुदान मिळाले नसेल त्यांना ते लवकर द्यावे, खाजगी दवाखान्यात भरमसाठ बिल दिले असेल तर ती बिले परत मिळावीत, टाकळी येथे बी एस एफ कँपमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करावा, गरिबांना रेशन कार्ड नसले तरीही धान्य देण्यात यावे, अशा मागण्या उपस्थित लोकांनी केल्या त्या आपण सरकारच्या कानी घालू असे आश्‍वासन आमदार सुभाष देशमुख यांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!