मुंबई : वृत्तसंस्था
मनसेने महायुतीकडे ३ जागांची मागणी केली आहे. मात्र, आता दोन जागांवर सकारात्मक चर्चा सुरू आहे. या जागांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे निर्णय घेतील, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
मुंबईतील सभा, मतदारसंघातील पक्षाच्या तयारीत घटनात्मक आढावा तसेच महायुतीतील सहभागाबाबत मनसे नेत्यांची बैठक राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी बुधवारी दुपारी पार पडली. या बैठकीविषयी माहिती देताना नांदगावकर म्हणाले, महायुतीतील मनसेच्या समावेशाबाबत चर्चा सुरू आहे, यासंदर्भात लवकरच निर्णय होईल. महायुतीत सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय राज ठाकरे घेतील. मनसेला कोणत्या दोन जागा मिळणार आहेत, असे विचारले असता राज ठाकरे म्हणाले सध्या वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे आणि याची माहिती राज ठाकरे यांनाच आहे. महायुतीतील समावेशानंतर यासंदर्भातील माहिती दिली जाईल.
राज ठाकरे यांनी काही जागा ठरवलेल्या असतील. त्यांना काही खात्री असेल, अशा जागा त्यांनी मागितल्या आहेत. मनसे आणि शिवसेनेच्या विलिनीकरणाबाबत माझ्याकडे कोणतीही माहिती नाही, जर तसे काही असेल तर ते दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांना माहिती असेल, त्याची माहिती आमच्याकडे नाही. महायुतीतील चर्चा बिनसल्यास काय, यावर पक्षप्रमुख राज ठाकरे निर्णय घेतील, असेही नांदगावकर म्हणाले.